डि. एस. के कर्मचार्यांच्या मुजोरीने ग्राहक हैराण
चलन तुटवड्याने बँक देईना छदाम
अहमदनगर/वाणिज्य, प्रतिनिधी, दि. 20 - आपण डि. एस. के. टोयाटो यांच्याकडून महागडी चारचाकी गाडी घेण्याचा विचार करीत असाल तर दहा वेळा विचार करा. गाडी खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही मंडळींचा अनुभव तपासा, म्हणजे आज त्यांना होत असलेला पश्चाताप आणखी कुणाला होणार नाही.होय.. डि. एस. के. टोयाटो यांच्याकडून ज्यांनी ज्यांनी वाहने खरेदी केली आहेत ती मंडळी अशीच पद्धतीने पश्चाताप व्यक्त करू लागले आहे. त्याला कारणीभूत ठरली आहे नोटाबंदी नंतरची परिस्थिती, भासणारा चलन तुटवडा आणि या परिस्थितीचा फायदा लाटणारी डिएसके टोयाटोच्या अधिकारी कर्मचार्यांची मग्रुरी, मुजोरी.
डि. एस. के. ने हे महाराष्ट्रात भलं मोठं प्रतिष्ठीत नाव. घोर परिश्रमातून उदयाला आलेलं व्यावसायिक बांधकाम आणि वाहनं क्षेत्रात. आदर्श पथ निर्माण करणारे व्यक्तिमत्व. उमलत्या वयात काबाडकष्ट करून रोजीरोटीचा संघर्ष, थरारक अनुभव गाठीशी असल्याने, भरभराटीनंतर व्यवसायात नितीमत्ता पाळणारा उद्योजक म्हणूनच त्यांची ख्याती. स्वाभाविकपणे अशा व्यवसायिकाकडे ग्राहकांचा पाहण्याचा दृष्टीकोन सहानुभूतीचाच आणि हिच सहानुभूती डि. एस. कें. च्या एकूणच भरभराटीचे मोठे भांडवल ठरले.
ज्या भांडवलावर भरभराट झाली ते भांडवलच बदलत्या काळात कुरतडण्याचे नतदृष्ट प्रयत्न सुरू झाल्याने ग्राहकवर्ग मोठ्याप्रमाणावर नाराज असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. व्यवसायाच्या यशाचे अधिष्ठान म्हणजे ग्राहकसेवा हे डि. एस. कें.चे ब्रिद चलन तुटवड्याचा लाभ उठवून ग्राहकांना नागविण्याचा एककलमी कार्यक्रम डि. एस. कें.च्या व्यवसाय दालनात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
डि. एस. के. टोयाटोकडून वाहन खरेदी केलेल्या ग्राहकांना आपल्या वाहनांची सर्व्हिसिंग केल्यानंतर त्याचे बिल अदा करताना एजन्सीच्या अधिकारी कर्मचार्यांच्या मुजोरीला सामोरे जावे लागत आहे. विद्यमान परिस्थितीत उद्भवलेल्या चलन तुटवड्यामुळे सर्व्हिसिंगचे बिल अदा करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम ग्राहकांना बँक खात्यावरून काढता येत नाही. तर दुसरीकडे एजन्सीत तेवढ्या रकमेचा धनादेशही स्वीकारला जात नाही.
या उद्भवलेल्या परिस्थितीत ग्राहकांची मात्र मानसिक, आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच डि. एस. कें.च्या कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचार्यांच्या अरेरावीने भिक नको पण कुत्रे आवर असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. अधिकारी - कर्मचार्यांची उद्धट बेमुवर्तखोरगीरी डि. एस. कें. ना कितपत ज्ञात आहे या विषयी स्पष्टपणे सांगणे अवघड असले तरी ही प्रवृत्ती डि. एस. कें.ना कष्टातून उभा केलेल्या या व्यवसायाची विट न विट ढासळण्याची प्रक्रिया यामुळे वेग घेऊ शकेल. हा सारा प्रकार डि. एस. कें.च्या निदर्शनास आणून द्यायचे म्हटले तर त्यांचा संपर्क क्रमांकही मुजोर कर्मचारी देत नाहीत.
अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, व्हिसा कार्ड नाहीत अशा ग्राहकांना अधिकच मनस्ताप सोसावा लागत असून त्यातच शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांचा भरणा अधिक असल्याने नव्याने वाहन खरेदी करू पाहणार्या ग्राहकांना ही मंडळी वरिष्ठप्रमाणे सल्ला देताना दिसते आहे.
