Breaking News

उ.प्र. विधानसभा निवडणूक देशाची दिशा निश्‍चित करेल - अखिलेश यादव

लखनौ, दि. 03 - उत्तर प्रदेशात तिस-यांदा रथ चालवण्याची संधी मिळाली आहे. रथयात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणार आहोत.  त्यातून जनता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करेल. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक देशाची दिशा निश्‍चित करेल, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज केले.
उत्तर प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षातर्फे समाजवादी विकास रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने  मुख्यमंत्री यादव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव व प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव हेही उपस्थित होते.  यात्रेनिमित्त शिवपाल यादव यांनी मुख्यमंत्री यादव यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. त्यात काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री यादव म्हणाले की, राज्यातील विधानसभा निवडणूक देशाचे राजकारणच बदलून टाकेल. देश कोणाच्या हातात जात आहे हे पाहण्याची आवश्यकता  आहे. आमच्या सरकारने नेहमीच चांगले काम केले आहे आणि दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण केली आहेत. जनता पुन्हा एकदा इतिहास घडवेल आणि समाजवादी  पक्षालाच निवडून देईल, असा विश्‍वासही यादव यांनी व्यक्त केला.