बालजत्रेला बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद
। जादूचे प्रयोग, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन : न्यू बाल होममिनिस्टर ठरले लक्षवेधी
पुणे, दि. 20 - अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखा, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व दूर्वांकूर महा-ई-सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनाचे औचित्य साधून गोल मैदान येथे आयोजित बालजत्रेला बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जत्रेत खाऊ वाटप, खेळ, नृत्य व रंजक खेळणी मांडण्यात आली होती. तसेच रायफल शूटिंग, मेहंदी, टॅटू, पपेट शो, जादूचे प्रयोग आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.मुलांना इतिहासातील शस्त्रांची माहिती व्हावी म्हणून डॉ. प्रमोद बोर्हाडे यांच्या संग्रही असणारे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शीतल कापशीकर यांचा न्यू बाल होममिनिस्टर हा आगळावेगळा कार्यक्रम जत्रेचा मुख्य आकर्षण ठरला. बालमित्रांनी सामूहिक नृत्य करून धमाल उडवून दिली. बालजत्रेला तळेगावातील बच्चेमंडळींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी रोटरी सिटीचे अध्यक्ष विलास काळोखे व अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे म्हणाले, तळेगावात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सात हजारांहून अधिक लोकांनी भेट दिली. संध्याकाळी गजबजून गेलेला गोल मैदानाचा परिसर याची साक्ष देत होता. पुढील वर्षीही अशा जत्रेचे आयोजन केले जाईल, याची ग्वाही त्यांनी दिली.मनीषा काळोखे, भारती धोत्रे, माधुरी शहा व रेणुका भांडवलकर यांनी स्वागत केले. नितीन शहा, संजय मेहता, सचिन भांडवलकर, प्रकल्पप्रमुख शाहीन शेख, सविता करणकोट, रश्मी फडतरे, मनीषा काळोखे, भारती धोत्रे, रेणुका भांडवलकर, माधुरी शहा, कामिनी हळदे, प्रतिभा मेहता, सुनीता रिकामे, सुमित्रा दौंडकर, दीपाली किरवे, ऊर्मिला छाजेड, नयना डोळस व विजयालक्ष्मी विश्वकर्मा आदींनी बालजत्रेचे संयोजन केले. शशिकांत हळदे यांनी आभार मानले.
