Breaking News

गुन्ह्याचा तपासासाठी अकोले पोलीस ठाण्यासमोरआमरण उपोषण

अहमदनगर, दि. 04 - अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी फिर्यादीनां जीवाचा आटापिटा करावा लागतो. गुन्हा दाखल करण्यासाठी अनेकदा  दिवसभर पोलीस ठाण्यात बसून रहावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्ह्याचा तपास सुरू व्हायला पुन्हा अनेक हेलपाटे  मारावे लागतात. या त्रासाला कंटाळून वाघापूर, तालुका  अकोले येथील सुरेखा गोपीनाथ लांडे ही विवाहित महिला  मंगळवारी ( 1 नोव्हेंबर ) सायंकाळी सात  वाजता आपले वृद्ध सासरे सखाराम दाजी लांडे व मुलगा सुजीत गोपीनाथ लांडे हे  आपल्याला न्याय मिळावा म्हणून अकोले पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर  उघड्यावरच आमरण उपोषणास बसले आहेत.
      गोपीनाथ सखाराम लांडे, राहणार वाघापूर, तालुका अकोले यांच्या मानेवर आरोपी आप्पासाहेब गोविंद कानवडे  ( लिंगदेव ) याने धारधार चाकूने वार करून  मारहाण केली. अकोले पोलीस ठाण्यात फिर्यादी सुरेखा गोपीनाथ लांडे यांनी तक्रार दाखल केली. यासंदर्भात आरोपींच्या विरोधात 16 आक्टोबर रोजी सायंकाळी  अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी  तबाजी रामजी झोळेकर (धुमाळवाडी),  महादू दाजी लांडे ( वाघापूर ) , आप्पासाहेब गोविंद  कानवडे  ( लिंगदेव ) यांच्या विरोधात भादवी 326, 323, 504 अन्वये दिनांक 16 आक्टोबर 2016 राजी गुन्हा दाखल करण्यात येवून  आतापर्यंत कोणत्याही  प्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही. यातील जखमी झालेले गोपीनाथ सखाराम लांडे यांच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार  सुरू आहेत.  फिर्यादी सुरेखा गोपीनाथ लांडे हिने  अकोले पोलीस ठाण्यात दाखल केलेली फिर्याद मागे घ्यावी, यासाठी आरोपीकडून दबाव आणला जात आहे व  दमदाटी करण्यात येत आहे.  आरोपीकडून  आमच्या जीविताला धोका आहे, अशी तक्रार सुरेखा गोपीनाथ लांडे यांनी केली असून पोलिसांनी गुन्ह्याची चौकशी  करावी, यासाठी  आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.