Breaking News

शहर विकासात शिवसेनेचे मोठे योगदान ः शिंदे

। कोठी व बालिकाश्रम रस्त्याचे काम महापौर शिंदे यांच्या काळातीलच
अहमदनगर, दि. 20 - शिवसेना उपनेते अनिल राठोड व शिवसेनेचेे शहराच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. शीला शिंदे यांनी महापौरपदाच्या काळात कोठी व  बालिकाश्रम रस्त्याचे काम पूर्ण केले. फेज -2 चे काम मंजूर करून घेतले. मात्र, विरोधकांना हे काम पूर्ण करता आले नाही. हे काम महापौर सुरेखा कदम यांच्या  माध्यमातून पूर्णत्वाकडे नेऊ. शहराच्या विकासाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे. राज्यात युतीचे शासन आले असून, शासनाकडे विविध योजनांसाठी प्रस्ताव  पाठविले आहेत. हे प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन विविध मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू होतील. लवकरच समर्थनगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी  सोडण्यात येणार असून, त्यानंतर या भागाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, असे प्रतिपादन सभागृहनेते अनिल शिंदे यांनी केले.
प्रभाग 27 मधील श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल परिसरात सभागृहनेते अनिल शिंदे व नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या प्रयत्नातून बंद पाईप गटार व  रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिंदे  बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर  भगवान फुलसौंदर, दत्ता जाधव, महेंद्र लोढा, संजय बरमेचा, विठ्ठल वाघमारे, संजय गुगळे, नीलेश भालेकर, डॉ. रवींद्र मुथा, अ‍ॅड. कल्पना मुथा, अलका लोढा,  नीता शहा, एम. जी. क्षीरसागर, अशोक शहा, सचिन क्षीरसागर, बाळासाहेब ठुबे आदींंसह नागरिक उपस्थित होते.
 सचिन जाधव म्हणाले की, शिंदे यांनी या भागाचा विकास केला आहे. अनेक विकासकामे या परिसरात पूर्ण केली आहेत. गटारीचे काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण  करून त्यानंतर तेथे लगेचच रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारण गटारीची कामे पूर्ण झाली. मात्र, त्यानंतर रस्ता न केल्याने अनेक  नागरिकांना आगीतून फुफाट्यात आल्याच्या प्रतिक्रिया आपल्याकडे नोंदवल्या आहेत. त्यासाठी गटारीचे काम पूर्ण झाले की त्यानंतर तेथे रस्ता केला जाईल, असे  ते म्हणाले.
सुवर्णा जाधव म्हणाल्या की, श्री आनंदऋषी हॉस्पिटल परिसरातील हे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. हे काम शिंदे व आपण पाठपुरावा  करून मार्गी लावले. याबरोबरच प्रभागातील प्रश्‍नही सोडविले आहेत. या परिसरातील ओपन स्पेसचे सुशोभीकरण करणार आहोत, असे सांगितले.