दिल्ली विषारी धुरक्याच्या चादरीखाली गडप
शाळा, कार्यालयांना सुट्टी
नवी दिल्ली, दि. 05 - प्रदूषणाच्या विळख्याने दिल्लीकरांना चांगलेच घेरले असून, संपूर्ण दिल्ली विषारी धुरक्याच्या चादरीखाली गडप झाली आहे. या विषारी धुरक्यामुळे नागरिकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळा, कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.गुरुग्राममधल्या शाळांना 3 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीच्या इतिहासातील हे 17 वर्षातील सर्वात धोकादायक धुरके आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. दिल्लीत यामुळे प्रदूषण इमरजेंसी लागू करण्यात आली आहे. दिवाळीनंतर दिल्लीच्या हवेत प्रदूषणाच्या पातळीत सतत वाढ होत आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही दिल्ली सरकारला या मुद्द्यावरुन फटकारले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश लवादाने दिले आहेत.