Breaking News

पुस्तके माणसाचे जीवन समृद्ध करतात - स्वानंद बेदरकर

नाशिक, दि. 14 - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी सदैव आपल्या कृतीतून समाजाला प्रेरणा दिली. यामुळे ते देशाचे आदर्श बनले. त्यांची सर्व पाळेमुळे वाचनात होती. यातून पुस्तके माणसाचे जीवन समृद्ध करतात हे सिद्ध होते, असे प्रतिपादन स्वानंद बेदरकर यांनी आज व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने ‘वाचन संस्कृती’ या विषयावर आयोजित पहिल्या व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी विद्यापीठाच्या नियोजन अधिकारी डॉ. सुनंदा मोरे या होत्या. या वेळी व्यासपीठावर ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे होते.
विद्यापीठाच्या यश इन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना बेदरकर पुढे म्हणाले, वाचन माणसाच्या जाणीवा समृद्ध करते. जगण्याची सजगता तसेच माणसाकडे पाहण्याचे डोळे देते असे सांगून अनुभव आणि अनुभूतीतील फरक विविध अंगांनी उलगडून सांगितला. ज्याला मन वाचता येते, त्याला माणसांचे चेहरे वाचता येतात. नवीन तंत्रज्ञानाच्या अधिक वापरामुळे विद्यार्थी पुस्तकांपासून दुरावत चालला असून आता केवळ बघणार्‍यांची आणि पाहणार्‍यांची संस्कृती दिसतेय, यामुळे दिवसेंदिवस वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, अशा परिस्थितीत ग्रंथालय चळवळ रुजविण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आता पालकांनी पुढाकार देणे गरजेचे असून विकासाचे समीकरण पुस्तकांशी जोडायला हवे. कारण पुस्तकेच माणसाचे जीवन समृद्ध करतात. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचे अनेक दाखले देत ज्ञानाचे पाणी शोषून ते कसे मोठे झाले हे त्यांनी अनेक उदाहरणांनी पटवून दिले. पिढ्या उभ्या करण्यासाठी प्रत्येकाने ग्रंथालयात जायला हवे असे आवाहन त्यांनी या वेळी केले. डॉ. सुनंदा मोरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मधुकर शेवाळे यांनी केले. संतोष साबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, संशोधक व बीबीए विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक ग्रंथपाल प्रकाश बर्वे आदींनी विशेष परिश्रम घेतले.