Breaking News

मराठवाड्यातील प्रकल्पाचा पाणीसाठा 68 टक्क्यांवर

औरंगाबाद, दि. 14 - मराठवाड्यातील 850 मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांसह गोदावरी व मांजरा नदीवरील बंधार्‍यांमधील पाणीसाठा 68 टक्क्यांवर पोचला आहे. सततच्या दुष्काळाने कासावीस झालेल्या प्रकल्पांमधील हा पाणीसाठा गत दोन वर्षांतील सर्वाधिक ठरला आहे. 
 मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांत ऑक्टोबर 2014 मधील पहिल्या आठवड्याअखेर 33 टक्के तर 2015 अखेर केवळ 18 टक्के पाणीसाठा होता. तो आजघडीला 81 टक्क्यांवर पोचला आहे. दुसरीकडे ऑक्टोबर 2014 मधील ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडाअखेर मराठवाड्यातील 732 लघू प्रकल्पांत 28 तर 2015 मध्ये केवळ 12 टक्के असलेला पाणीसाठा आजघडीला 83 टक्क्यांवर पोचला आहे. पाणीसाठ्याचा टक्का चांगला दिसत असला तरी बारा मध्यम प्रकल्पांची तहान अजूनही कायम आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक दहा मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. वाकोद, सुखना, गिरजा, खेळना, अजिंठा अंधारी, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, ढेकू, बोरदहेगाव, जालना जिल्ह्यातील जुई यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील हरणी मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. गोदावरी नदीवरील 11 बंधार्‍यांमध्ये 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. अकरापैकी औरंगाबादमधील हिरडपुरी, परभणीमधील मुद्गल, मुळी, दिग्रस व नांदेडमधील आमदुरा बंधार्‍यांची तहान कायम आहे. दुसरीकडे मांजरा, तेरणा, रेणा नदीवरील 21 बंधार्‍यांपैकी 15 बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. इतर सहा बंधार्‍यांत अजूनही पाणीसाठ्याच्या टक्क्याने शंभरी ओलांडली नाही.