Breaking News

वाळू तस्करीसाठी ट्रकवर बोगस नंबरचा वापर

मिरज, दि. 29 -  शासनाचा महसूल बुडविण्यासाठी मालकांकडून वाळू तस्करीसाठी ट्रकवर बोगस नंबरचा वापर केला जात असल्याचे महसूल विभागाने केलेल्या  कारवाईत उघडकीस आले आहे. या बोगसगिरीची महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. बोगस नंबरचा वापर करणार्‍या ट्रक मालकांवर कारवाई करण्याचे  आदेश उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती मिरजेचे नायब तहसिलदार शेखर परब यांनी दिली.सोलापूर जिल्ह्यातून मिरज, सांगली व  कोल्हापूर जिल्ह्याकडे मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू तस्करी सुरु आहे. या चोरट्या वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने करडी नजर ठेवली आहे. या विभागाच्या  भरारी पथकाकडून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. मात्र या कारवाईत ट्रक मालकांनी केलेल्या  बोगसगिरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाळूला सोन्याचा दर आल्याने अनेकांनी वाळू तस्करीसाठी मालकीच्या ट्रकच्या संख्येत वाढ केली आहे.  एका मालकाने किमान चार ते पाच ट्रक आहेत. ट्रक मालकांनी एकाच ट्रकचा महसूल भरुन चार ट्रकचा महसूल बुडविण्यासाठी बोगस नंबरचा वापर करुन वाळू  तस्करी सुरु केली आहे. वाळू तस्करीप्रकरणी तहसीलदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने केलेल्या कारवाईत हा खरा प्रकार उघडकीस आला  आहे.