Breaking News

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी ः चव्हाण

सांगली, दि. 29 - दोन बिल्डरांतील वादात डॉनने मध्यस्थी करावी, तसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचा वाद हाताळला. आपल्या  वर्तनाने त्यांनी महाराष्ट्राचा देशभरात अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केला.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचा अर्ज दाखल करण्यासाठी चव्हाण आले होते. यावेळी ते  म्हणाले मनसे नेते राज ठाकरे यांनी पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असल्याच्या मुद्यावरुन ऐ दिल... चित्रपटांचे प्रदर्शन रोखले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी  निर्माता करण जोहर समवेत समोरसमोर बैठक घेऊन तोडगा काढला होता. त्यात पाच कोटी रुपयांचा निधी सैनिक कल्याण निधीला द्यायचा वादग्रस्त तोडगाही  होता. त्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना पृथ्वीराज यांनीही उडी घेतली.
ते म्हणाले, फडणवीसांनी आपल्या वर्तनाने महाराष्ट्राला देशात कमीपणा आणलाय. सैनिकांनीही चित्रपट निर्मात्यांकडून घेतलेल्या खंडणीची पाच कोटींची रक्कम  सैनिक कल्याण निधीला द्यायला सेनादलातील अनेक माजी अधिकार्‍यांनी विरोध दर्शवला आहे. यावरुन या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात यावे. त्यामुळे फडणवीसांनी  आपल्या वर्तनाबद्दल जांहीर माफी मागावी. माझ्याकडे सर्वांच्या भानगडीच्या कुंडल्या आहेत, असे सांगणार्‍या मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करताना ते म्हणाले,  त्यांचे हे राजकीय ब्लॅकमेलिंगच आहे. इशारे कसले देता, कारवाई करा. सहकारातील चुकीच्या गोष्टींवर कारवाई करायला आमचा विरोध नाही, मात्र सहकारच  मोडीत काढण्याचे धोरण चुकीचे आहे. त्यांनी केवळ इशारेच दिले असून कृती नसल्याने त्यांच्या अपयशी कारभाराला झाकण्यासाठी ते आता जातीचाही आधार  घेत आहेत. मी ब्राम्हण आहे म्हणून मला कुणी मुख्यमंत्री पदावरुन दूर करु शकत नाहीं, असे त्यांचे विधान महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान करणारे आहे. या  राज्याने गुणवत्ता पाहून मुख्यमंत्र्यांना स्वीकारले. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, बॅरिस्टर ए. आर. अंतुल अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. कदाचित  मुख्यमंत्र्यांना आता परतीच वेध लागले असावेत. ते त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत आहे.