Breaking News

बारामती तालुक्यातील पळशीत उत्साहात फार्म मॅरेथॉन

।  मॅरेथॉनचा मार्ग 5 गावातून होता / स्पर्धेत अनेकांचा सहभाग

पुणे, दि. 26 - तालुक्यातील पळशी येथील बारामती कृषी पर्यटन केंद्रात आयोजित करण्यात आलेली भारतातील पहिली फार्म मॅरेथॉन मोठया दिमाखात संपन्न  झाली. या मॅरेथॉनमध्ये बारामती सायकल क्लब, बारामती रनर्स ग्रुप मेंबर्स, पी. आर. बी. एम. पुणोचे सभासद, तसेच पळशी गावातील खूप मुले, मुलींनी सहभाग  नोंदवला, एकूण 100 पेक्षा अधिक धावपटूंनी मॅरेथॉन पूर्ण केली .
मॅरेथॉनचा मार्ग 5 गावातून होता. शालेय विद्यार्थी, गावातील महिला, पुरुष या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. शाळकरी मुलींचा सहभाग ही उल्लेखनीय बाब होती.  त्यात आशा किसन करे, व मंगल चिमाजी गडदरे या दोन मुलींनी 11 कि.मी.ची मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांचे सर्व पाहुण्यांनी कौतुक केले.  समारोप प्रसंगी बारामती  टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू, तथा जिल्हा क्रीडा अधिकारी, जगन्नाथ  लकडे, पी. आर. बी. एम. पुणोचे प्रसाद पाटील आदी मान्यवरांसह, तसेच बारामती सायकल क्लब, बारामती रनर्स ग्रुप, मेंबर्स, मुक्ती ग्रुपचे अरविंद तावरे, फार्म  मॅरेथॉनचे श्रीधर हंपीहोली, पळशी गावचे सरपंच, साबळे, खेत्रे, भंडलकर व पळशी गावातील विविध मान्यवर उपस्थित होते. समारोप प्रसंगी फार्म मॅरेथॉनचे  प्रवर्तक पांडुरंग तावरे यांनी प्रास्ताविकात फार्म मॅरेथॉनचा उद्देश सांगितला,
या वेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, भारतात कृषी पर्यटन संकल्पनेबरोबरच आता फार्म मॅरेथॉनची संकल्पना पांडुरंग तावरे यांनी सुरू करून शहरी आणि ग्रामीण दरी  कमी कमी करण्याचा खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. ऑलिंपीक स्पर्धेबद्दल आपण नेहमी बोलतो; परंतु आपल्या ग्रामीण भागातील मुलांना त्याची माहिती  मिळत नाही. आंतरराष्ट्रीय खेळाडू बरोबर गावातील मुलांना चर्चा करता आली. पुढे या पळशी गावातूनसुद्धा एखादी मुलगी ऑलिम्पिक स्पर्धा जिंकून भारताचे नाव  उज्ज्वल करू शकते. अशा उपक्रमांना पवार कुटुंबीयांची नेहमीच साथ असेल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. या वेळी जगन्नाथ लकडे यांनी ग्रामीण भागातील मुलांमध्ये  असलेल्या क्षमतेला वाव मिळावा, मी मॅरेथॉन मुळेच घडलो, अशा उपक्रमाची खरी गरज खेडेगावात आहे, असे म्हटले. प्रसाद पाटील यांनी पालकांनी आपल्या  मुलांना अभ्यासाबरोबर खेळाची गोडी लावली पाहिजे असे सांगितले.