Breaking News

महाराष्ट्राचे ‘अच्छे दिन’ हद्दपार !

दि. 28, ऑक्टोबर - मागील दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतांना तत्कालीन विरोधकांनी ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ ही धुन लावून धुराळा उडवून दिला होता. महाराष्ट्रातील मोदी टीमने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभार्‍यांची लक्तरे महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली होती. लोकशाही आघाडी सरकारला नागडे करून त्यांची मतदारांमध्ये धिंड काढली होती. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून महाराष्ट्रात सत्तांतर झाले. तत्कालीन विरोधक विद्यमान सत्ताधारी बनले. मुळ परिस्थितीत मात्र मोठा फरक पडलेला दिसत नाही. अच्छे दिन तर आले नाहीतच उलट संयुक्त आघाडी सरकारच्या काळातील बरे दिनच बरे होते अशी म्हणण्याची पश्‍चातापयुक्त वेळ महाराष्ट्राच्या जनतेवर आली आहे. मोदी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात प्रत्येक आघाडीवर सरकारच्या पदरी पडत असलेल्या अपयशाची मिमांसा आता सुरू झाली आहे. विरोधकांकडून टिकेची झोड उठविली जात आहे. विरोधकांकडून होत असलेली ही टिका केवळ राजकीय असती तर कदाचित त्या टिकेला जनाधार मिळणे दुरापास्त होते. मात्र या सरकारच्या एकुणच कारभार शैलीने जनमानसातही तिव्र नाराजी पसरली आहे. त्याचाच आयता फायदा पहिल्याच वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीला मिळू लागला आहे. थोडक्यात राजकीय पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादीसारख्या अनुभवी अन मुत्सद्दी नेत्यांची फळी असलेल्या राजकीय नेत्यांच्या तिव्र विरोधाला सामोरे जात असतांनाच जनमानसात पसरत चाललेली नाराजीदेखील भाजप सरकारला सोसावी लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात महागाईने गाठलेला कळस हाच या नाराजीचा मुख्य गाभा आहे. नेमकी हीच नाडी पकडून विरोधकांनी आपल्या विरोधाला धार लावली आहे. सामाजिक आणि राजकीय पातळीवर सरकारची कोंडी होत असतांनाच संवेदनशिल, भावनिक आणि विद्वान म्हणून सहसा राजकीय सामाजिक वादात थेट हस्तक्षेप न करणारा साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वर्गही मोठ्या प्रमाणात सरकारच्या कारभारावार नाराजी व्यक्त करू लागला आहे. विशेषतः हिंदू धर्माचा अतिरेकी अनुनय आणि त्यातून घडत असलेल्या विचारवंतांच्या हत्या, सामान्यांचे पाडले जात असलेले मुडदे, आणि सरकारची त्यावर असलेली निष्क्रीय भुमिका हाच या नाराजीचा गाभा आहे. बाहेरून असा चौफेर हल्ला होत असतांनाच सत्तेच्या महालातही दोन भावांमध्ये धुसफुस सुरू आहे. सत्तेच्या महालाचा पाया रचत असतांनाच खरे तर या भांडणाची बीजे रोवली गेली आहेत. दुषीत बीजांना फुटलेल्या रोगट अंकुरांतून उभा राहिलेला हा सत्तेचा वृक्ष इतका पोखरला आहे की, कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. थोडक्यात अच्छेदिनचा वादा करणार्‍या सत्तेच्या ठेकेदारांनी महाराष्ट्राचे बरे दिनही हद्दपार केले. अशीच भावना जनमानसात व्यक्त केली जात आहे.