Breaking News

नागवडे’ची वार्षिक सभा प्रथमच खेळमेळीत

श्रीगोंदा (प्रतिनिधी)। 01 - नागवडे’ कारखाना कधीही काटा मारत नसल्याची सभासदांना खात्री असल्यानेच शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस देतात. मागीलवर्षी नागवडे कारखान्याने एफआरपी प्रमाणे 2166 रुपये बाजार भाव दिला आहे. त्यातील पंचेचाळीस रुपयांची उर्वरित रक्कम येत्या 1 ऑक्टोबरला शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. 
राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे प्रथमच वार्षिक सभेला अनुपस्थित होते. मात्र तरीही ही वार्षिक सभा बाजार समिती निवडणुकीच्या धर्तीवर नेत्यांनी घेतलेल्या ’मिले सूर मेरा तुम्हारा’च्या भूमिकेमुळे प्रथमच खेळमेळीच्या वातावरणात पार पडली.
           नागवडे कारखान्याची 51वी वार्षिक सभा राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बोलताना नागवडे पुढे म्हणाले, नागवडे कारखाना ही शेतकर्‍यांची कामधेनू आहे. कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात लाखो रुपयांची जलसंधारणाची कामे केल्याचे सांगत जलसंधारणाच्या कामासाठी मुख्यमंत्री निधीसाठी दहा लाख रुपये दिल्याचेही नागवडे यांनी सांगितले.  कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उसाचे बेणे उपलब्ध करून देण्याचे काम केले.
 माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, डोळा पद्धतीने ऊस लागवड होणे गरजेचे आहे. विहीर व बोअर पुनर्भरण काळाची गरज बनली आहे. घोड’च्या पाण्यासाठी तालुक्यातील नेत्यांनी एकत्रित लढा दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही.
सेनेचे घनश्याम शेलार म्हणाले, नागवडे कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. मात्र साखर विक्री इतर कारखान्याच्या तुलनेत कमी किमतीने असल्याने चिंताजनक आहे. कुकडी’ने नागवडे कारखान्याच्या धर्तीवर कारारनामे केल्याचे सांगितले, याबाबत शेलार यांनी नागवडे कारखान्याकडे स्पष्टीकरणाची मागणी  केली.