काष्टीत विद्यार्थ्यांची अवयवदान जनगजागृती रॅली
। मरणोत्तर समाजोपयोगी पडण्याची अवयव दान हि मोठी देणगी: डॉ. मालन परंडे
श्रीगोंदा (प्रतिनिधी)। 01 - परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील काष्टी येथे अवयव दान जन जागृती रॅलीचे आयोजन केले. समाजामध्ये अवयव दानाची संकल्पना रूढ व्हावी व त्याची उपयोगिता लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने अवयव दान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मेडिकल असोसिएशन श्रीगोंदा , जिल्हा प्राथमिक आरोग्य विभाग व परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काष्टी येथील महालक्ष्मी चौकातून सुरु झालेली रॅलीची सांगता शहरातील प्रमुख मार्गाने कष्टी सहकारी सोसायटी येथे करण्यात आली. यावेळी सांगता समारंभां मध्ये अवयव दानाविषयी सखोल मार्गदर्शन बी. जे. मेडिकल कॉलेज येथील प्राध्यापिका डॉ. मालन गोरी परंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या तसेच परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई पाचपुते होत्या.या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. प्रतिभाताई पाचपुते म्हणाल्या की, जिवंत रुपी माणसाने इतरांना कायम मदत करणे हेच खरे कर्म असले तरी आपल्या मरणा नंतर हि समाजाच्या उपयोगी पडणे हा खरा धर्म होय. यावेळी बोलताना अवयव दान संबंधी सकारात्मक विचार करून आपण माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह सह कुटुंब या अवयव दानाच्या चळवळी मध्ये सहभागी असल्याचे सांगितले.आपल्या मरणोत्तर अवयव दानामुळे आपल्या पश्चात इतरांचे जीवन सुकर होऊ शकते असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.मालन गोरी परंडे यांनी अवयव दान संबंधी गैरसमज दूर करण्यावर भर दिला. समाजातील रूढी बाजूला ठेऊन मरणोत्तर समाजोपयोगी पडण्याची अवयव दान हि मोठी देणगीच असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
काष्टी सहकारी सोसायटी मध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी परीक्रमाचे सचिव विक्रमसिंह पाचपुते, आरोग्य अधिकारी मेहबूब लुकाडे , डॉ.नितीन खामकर, डॉ. लाड, डॉ.पवार यांच्यासह काष्टी सोसायटीचे उपसभापती विठ्ठलराव काकडे, दीपक भोसले, सुवर्णाताई पाचपुते, परिक्रमा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.शायाले परिक्रमा डिप्लोमा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य अमोल खेडकर यांनी यावेळी आपले विचार मांडले. यावेळी काष्टी येथील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.