Breaking News

शिसे सुरक्षित पर्यावरण लोकचळवळ व्हावी : डॉ. कोकाटे

कराड, दि. 27 (प्रतिनिधी) : प्रत्येक घटकांमध्ये आढळणार्‍या शिशाच्या अतिप्रमाणामुळे मानवी आरोग्य व पर्यावरणावर अनेक घातक परिणाम होताना दिसून येत  आहेत. त्यामुळे शिशाच्या वापरावर निर्बंध आणण्याची गरज आहे. शिशाच्या घातक परिणांमाबाबत इंडियन सोसायटी ऑफ लेड अवेअरनेस अ‍ॅन्ड रिसर्च (इनस्लार)  आणि नॅशनल रेफरल सेंटर फॉर लेड प्रोजेक्ट इन इंडिया या संस्था देशभर जागृती करण्याचे काम करत आहेत. शिसे सुरक्षित पर्यावरण या त्यांच्या मोहिमेला  लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे, असे प्रतिपादन बेळगाव येथील केएलई अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चंद्रकांत कोकाटे यांनी केले. 
कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठात आयोजित दुसर्‍या आंतरराष्ट्रीय लेडकॉन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा  चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर ऑफ इंडियाचे महासंचालक डॉ. गिरीधर ग्यानी, इनस्लारचे  अध्यक्ष डॉ. थुप्पील व्यंकटेश, कार्याध्यक्ष डॉ. अब्बास अली महदी, कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सौ. नीलिमा मलिक, कुलसचिव डॉ. एम. व्ही.  घोरपडे, संशोधन संचालक डॉ. अरूण रिसबुड, परिषदेचे संयोजन सचिव डॉ. अरूण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कोकाटे म्हणाले, भारतात आरोग्य व पर्यावरण क्षेत्राकडे दूर्लक्ष केल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. सन 2009 सालच्या अहवालात देशाचा आरोग्य विभाग  शहरांना मध्यवर्ती मानून काम करत असल्याचे नमूद केले आहे. ज्यावेळी आरोग्य विभाग ग्रामीण भाग डोळ्यासमोर ठेऊन रुग्णांना केंद्रीभूत मानून कार्य करेल  तेव्हाच खर्‍या अर्थाने सक्षम होईल. विकसनशील देशांना शिशाच्या घातक परिणामांचा सामना करावा लागत आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर  जागृती करण्याची गरज आहे. शिशाच्या घातक परिणामांबाबत कृष्णा विद्यापीठाने स्थापन केलेल्या लेड रेफरल लॅबच्या माध्यमातून राबविले जाणारे उपक्रम  कौतुकास्पद आहे. या परिषदेच्या निमित्ताने तयार केला जाणारा कराड जाहीरनामा शिसे सुरक्षित पर्यावरण चळवळीला पुढे नेण्यासाठी व सरकारी धोरण  ठरविण्यासाठी निश्‍चितच मार्गदर्शक ठरेल.
शिसे सर्वांत घातक व विषारी घटक आहे. अलीकडे खाद्य पदार्थांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शिशाच्या घातक  परिणामांबाबत व्यापक जागृती करण्याची गरज असून वैद्यकीय शिक्षण देणार्‍या रुग्णालयात लेड रेफरल विभाग असावा, अशी मागणी परिषदेने भारत सरकार व  मेडिकल कौन्सिलकडे करावी, असे आवाहन ’कृष्णा’चे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. याप्रसंगी डॉ. गिरीधर ग्यानी, डॉ. थुप्पील व्यंकटेश आणि डॉ.  अब्बास अली महदी यांनी शिशाच्या घातक परिणामांबाबत जगभर सुरू असलेल्या जनजागृती मोहिमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लेडकॉन  2016 या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सौ. नीलिमा मलिक यांनी स्वागत व प्रास्तविक केले. डॉ. एम. व्ही. घोरपडे व डॉ. अरूण रिसबुड  यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. दीपाली जानकर व डॉ. खुशबू भाटिया यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अरूण पाटील यांनी आभार मानले.