Breaking News

महाबळेश्‍वरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकार्‍याच्या कारची तोडफोड

महाबळेश्‍वर, दि. 27 (प्रतिनिधी) : युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांच्या कारवर  मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून गाडीची तोडफोड  केल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आज गाडीवर दगड फेकलेत उद्या डोक्यात पडतील, अशा आशयाचा संदेशही हल्लेखोरांनी सोडल्याने  शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करून तातडीची बैठक घेवून या भ्याड हल्ल्याचा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी  निषेध केला.
महाबळेश्‍वर शहराच्या मध्यवस्तीत शिक्षक सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये सचिन वागदरे राहतात. रात्री उशिरा ते सोसायटीमध्ये आले त्यांनी त्यांची गाडी  सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. मध्यरात्री 3 नंतर मोटार सायकलवरून दोन इसमांनी सोसायटीमध्ये प्रवेश करून मोठा दगड गाडीच्या मागील काचेवर  टाकला. तसेच जाताना हल्लेखोरांनी मोठ्या आकाराची एक चिठ्ठी गाडीवर टाकली. त्यामध्ये काल टि. व्ही. वर झळकत होतास, आज गाडीवर दगड टाकलाय  उद्या डोक्यात पडेल, असा मजकुर लिहिला होता. याबाबत अधिक चौकशी केली असता एका दूरचित्र वाहिनीने पालिका राजकारणासंदर्भात एक शोे आयोजित  केला होता. या शोमध्ये बोलताना सचिन वागदरे यांनी येथील एका नगरसेवकांवर आरोप केले होते. त्यामुळे हा हल्ला संबंधित नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी केला  असावा, अशी तक्रार सचिन वागदरे यांनी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. तर काही संशयितांना पोलीस ठाण्यात  बोलावुन चौकशी केली. मात्र, हल्लेखोर कोण आहे याचा तपास लागला नाही. दरम्यान, येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या तातडीच्या बैठकित निवडणुकीचे  वातावरण असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडु नये यासाठी संयम पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.