Breaking News

खेळांच्या विकासासाठी क्रीडा संघटकाचे कार्य मोलाचे : मुद्गल


सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : खेळाच्या विकासासाठी क्रीडा संघटकांचे कार्य मोलाचे आहे. कै. नंदा जाधव ने सातार्‍यासारख्या सुविधा नसलेल्या भागातून 20  वर्षांपूर्वी क्रीडा क्षेत्रात सातारचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवोदित क्रीडापटूंनी वाटचाल करावी, असे मत  जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी व्यक्त केले.
नंदा जाधव प्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रा. राम कदम यांचा नंदा जाधव स्मृती पुरस्कार देवून गौरवण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले होते. शासनातर्फे खेळाडूंना सुविधा देवून खेळाडूंची गुणवत्ता वाढविण्यासाठी भविष्यात  प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुद्गल यांनी दिली.
नंदा जाधव प्रतिष्ठानतर्फे 17 वर्षे रक्तदान शिबिर, खेळाडूंना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले जातात. प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी असून या उपक्रमाला आपण  नेहमी सहकार्य करू, अशी ग्वाही श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना प्रा. राम कदम यांनी नंदा जाधव यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना नंदा जाधव यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे निश्‍चित मानाचे आहे, असे  सांगितले. प्रतिष्ठानचे सचिव सुरेश साधले यांनी प्रास्ताविक केले व टी. आर. गारळे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ. सुरेश शिंदे, डॉ. प्रविण जाधव,  अर्चना देशमुख, पोळ आप्पा उपस्थित होते. संतोष सोनमळे, अँड़. निता घाडगे, मुकुंद वेदपाठक, बाळासाहेब जाधव, विजय पाटील, संभाजी देशमुख, ज्ञानदेव  गोडसे यांनी सहकार्य केले.