Breaking News

लेखापरीक्षण दाखल करण्याची जबाबदारी ट्रस्टींची

अहमदनगर (प्रतिनिधी) । 29 -  सर्व धर्मदाय संस्थांनी दरवर्षी आर्थिक पत्रके कायद्यातील विहित नमुन्यात लेखापरीक्षण करून मुदतीपूर्व दाखल करण्याची  जबाबदारी ही संस्थेच्या सर्व विश्‍वस्तांची (ट्रस्टींची) आहे. ही आर्थिक पत्रके व ऑडिट रिपोर्ट विहित नमुन्यात दाखल न केल्यास ट्रस्टींना दहा हजार रूपयांपर्यंत  दंड होऊ शकतो, अशी माहिती धर्मदाय उपायुक्त एच. के . शेळके यांनी दिली.
चार्टर्ड अकौंटन्स इन्स्टिट्यूट अहमदनगरच्या वतीने धर्मदाय संस्था स्थापन प्रक्रिया व या ट्रस्टची आयकर आकारणी याबाबत चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी शेळके  बोलत होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात कोणकोणत्या व्यवहारावर धर्मदाय कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे, याबाबतची माहिती सांगितली.
चर्चासत्रात मुंबई येथील सीए विजय जोशी व सीए सुहास मालणकर यांनी संस्थेचे ट्रस्ट कायद्यान्वये व इन्कमटॅक्स कायद्यान्वये रजिस्ट्रेशन व त्यासाठी लागणारी  कागदपत्रे, ट्रस्टची इन्कमटॅक्स कायद्याखाली होणारी आकारणी व करमाफी मिळण्यासाठी पाळावयाचे नियम याबाबत मार्गदर्शन केले.
सीए इन्स्टिट्यूटच्या अहमदनगर शाखेचे अध्यक्ष सुशील जैन यांनी प्रास्ताविक केले. सानित मुथा यांनी सूत्रसंचालन केले. मंदार चौधरी व शिरीष बिमन यांनी  चर्चासत्राचे समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीए परेश बोरा, किरण भंडारी, प्रसाद भंडारी यांनी परिश्रम घेतले.