Breaking News

बाजारपेठेतील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई । शहर वाहतुक शाखेची नकारात्मक भुमिका कायम

अहमदनगर (प्रतिनिधी) । 29 - दिवाळीच्या पार्श्‍वभुमीवर ठरलेल्या सुचनेप्रमाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून वाहतुकीची कोंडी होत  असलेल्या कापडबाजारात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मोहिम सुरु झाली आहे. कापडबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी वाढली आहे.  वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर अडथळा निर्माण करणार्‍या अतिक्रमण धारकांवर तसेच बेशिस्त वाहनांवर कारवाई करुन रस्ता मोकळा केला जात  आहे. 
बाजारपेठेतील रस्त्यांवर लावलेली अस्ताव्यस्त वाहने आणि विक्रेत्यांच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. याकडे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी साफ  दुर्लक्ष झाले होते. गेल्या कित्येक वर्षापासून कापडबाजारात एकेरी वाहतुक करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात पोलिसांकडूनच एकेरी वाहतुक नियमांचे  उल्लंघन झाले. कोणत्याही रस्त्यावर पोलिसच दिसत नसल्याने दुचाकी वाहन चालकांबरोबरच चारचाकी वाहनेही एकेरी वाहतुकीतून धावत असल्याचे दिसत आहे.  सणाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस व मनपाने नियोजनासंदर्भात कागदावर उपाययोजना केल्या होत्या. या उपाययोजनांवर पोलिसांकडून आजअखेर कोणतीच कारवाई  झाली नाही. मात्र, मनपाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी मात्र अतिक्रमण विभागाला सुचना देऊन गुरुवारी कापडबाजारातील रस्त्यावर अडथळा निर्माण  करणार्‍या वाहनांवर कारवाई केली. महापालिकेनेच वाहने उचलण्याची कारवाई हाती घेतली. रस्त्यावर अडथळा ठरणार्‍या विक्रेत्यांनाही महापालिकेने हटवून  रस्त्यांचा श्‍वास मोकळा केला. गुरुवारी दिवसभर बाजारपेठेत ही कारवाई सुरू होती.
सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी आहे. रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने लावली जात आहेत. तसेच दिवाळीसाठी लागणार्‍या साहित्य विक्रीच्या  दुकानांनी रस्ते हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे दिवसभर शहरात सर्वच रस्त्यांवर कोंडीचा अनुभव येतो. ऑक्टोबर हिटमुळे आधीच त्रस्त झालेल्या  वाहनचालकांना रस्त्यावरील कोंडीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. उलट वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी ऐन दिवाळीत  पोलीस ‘धोनी’ पाहण्यात व्यस्त होते. त्याचवेळी इकडे बाजारात वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. महापालिकेने वारंवार पाठपुरावा करूनही वाहतूक  शाखेने कोणतीही कारवाई केली .
या कारवाईसाठी अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी, क्रेन, वाहन असे साहित्य व कर्मचारी बाजारात उतरविले. त्यांच्या मदतीला पोलिसांना येण्याचे आवाहन  केले. त्यानंतर शहरात अस्ताव्यस्त लावलेली वाहने उचलण्यात आली. या धडक कारवाईमुळे एकच धावपळ सुरू झाली.
बाजारपेठेत विक्रेत्यांनी रस्त्यांवरच ठाण मांडले आहे. ऐन दिवाळीत त्यांच्यावर कारवाई करणे उचित नसले तरी त्यांनी शिस्तीत बसणे आणि वाहतुकीस अडथळा  येणार नाही, अशा पद्धतीने दुकान लावणे गरजेचे आहे. मात्र रस्तेच ताब्यात घेणार्‍या विक्रेत्यांवरही महापालिकेने दिवसभर कारवाई केली. दिवसभरात 50 ते 60  विक्रेत्यांना हटविण्यात आले. उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी मिलिंद वैद्य, देविदास बिज्जा, विजय बोधे, सुरेश मिसाळ,  रिझवान शेख आदींच्या पथकाने ही कारवाई  केली.
बाजारपेठेतील वाहतुक कोंडीचा परिणाम बाहेरच्या रस्त्यावर झाला. गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सर्वच महामार्गावरील वाहतुकीची  कोंडी झाली होती. याचा त्रास रुग्णवाहिकेंना भोगावा लागला.