Breaking News

प्रॉमिनंटच्यावतीने वंचित घटकात प्रकाश निर्माणाचे कार्य

। अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंडित यांचे प्रतिपादन । अनामप्रेम व बालभवनच्या विद्यार्थ्यांना ऊबदार कपडे, फराळ व पौष्टिक आहाराचे वाटप 

अहमदनगर  (प्रतिनिधी)। 27 -  सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकांने वंचितांसाठी कार्य करावे. हे काम करण्यासाठी सामाजिक भान उपजत अंगी  असावे लागते. साममाजिक बांधिलकी जपत दिव्यांनी दिवा लावून वंचित घटकात प्रकाश निर्माणाचे कार्य प्रॉमिनंट करत आहे. वंचितांची दिवाळी आनंदात साजरी  करण्यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना अतिरिक्त पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी व्यक्त केली.
इंग्रजी भाषेचे व व्यक्तीमत्व विकासाचे दर्जेदार शिक्षण देणार्‍या सावेडी येथील प्रॉमिनंट संस्थेच्या वतीने अनामप्रेम व बालभवनच्या विद्यार्थ्यांना ऊबदार कपडे,  फराळ व पौष्टिक आहाराचे वाटप व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याच्या संकल्प कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंडित बोलत होते. यावेळी न्यू आर्टस,  कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एच. झावरे, प्रॉमिनंटचे संचालक जावेद शेख, प्रा.रज्जाक शेख, कॉन्ट्रॅक्टर दीपक दरे, हनिफ तांबोली, अजित माने,  राहुल पाटोळे आदिंसह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रॉमिनंट संस्थेच्या वतीने सावेडी परिसरातून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी  विद्यार्थ्यांनी दिवाळीत फटाके न वाजवण्याचे नागरिकांना आवाहन केले व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाची सुरुवात उरी  हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहून करण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते अनामप्रेम व बालभवनच्या विद्यार्थ्यांना ऊबदार कपडे, फराळ व पौष्टिक  आहाराचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात जावेद शेख यांनी प्रॉमिनंट संस्थेच्या वतीने इंग्रजी व व्यक्तीमत्वाच्या शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांच्या मनात  संस्कारक्षम मुल्यांची बीजे देखील रोवली जात असल्याचे सांगून, संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
बी.एच. झावरे म्हणाले की, सण-उत्सव काळानुसार बदलत चालले आहे. दिवाळीत कोणाच्या घरापुढे जास्त फटाके तर सण उत्सवात कोणाच्या मंडळापुढे मोठा  डिजे वाजतो याची स्पर्धा लागली आहे. आनंद व्यक्त करण्याची पध्दत बदलत आहे. डिजे प्रमाणे जास्त डेसिबलच्या फटाक्यांवर बंदी येणे देखील अपेक्षित  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व उपस्थित विद्यार्थ्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्‍वेता पारेख व प्रिया साठे यांनी केले. कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी निखील मकासरे, अ‍ॅलेक्स मसी, अमृता जीवे आदिंसह प्रॉमिनंट संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.