Breaking News

कचरा डेपो पाठोपाठ बेग पटांगणातही आग

। अग्नीशामक दलाच्या कार्यालयासमोरच लागली आग । फिरते शौचालय जळून झाले खाक । गलथानपणा समोर  

अहमदनगर (प्रतिनिधी) । 27 - मनपाच्या वादग्रस्त असलेल्या कचरा डेपोला आग लावल्याची घटना चर्चेत असतांनाच मंगळवारी सायंकाळी जुन्या  महापालिकेसमोर असलेल्या बेग पटांगणातील भंगाराला  अचानक आग लागली. या आगीत भंगाराचे सामानासह महापालिकेचे फिरते शौचालय जळून खाक झाले.  विशेष म्हणजे आग लागली त्यावेळी नागरीक अग्नीशामक विभागाच्या कार्यालयाकडे पळत आले मात्र तेथे एकही कर्मचारी नव्हता.
याबाबत नागरीकांच्या चर्चेतून समजलेली सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (दि. 25) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जुन्या महापालिकेसमोरील  बेग पटांगणात असलेल्या भंगाराच्या सामानाला अचानक आग लागली. यावेळी परिसरातील नागरीक तात्काळ अग्नीशामक विभागाच्या कार्यालयाकडे पळत आले.  त्यावेळी प्रभारी नगरसचिव तडवी हेही घटनास्थळावरुन कार्यालयाकडे आले. मात्र तेथे एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  नगरसेवक दिप चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी अग्निशामक विभागाच्या कार्यालयात जाऊन तेथे उपस्थित असलेल्या बिगारी यांच्याकडून  गाडीची चावी घेतली आणि खाजगी इसमामार्फत अग्निशामक वाहन घटनास्थळी नेवून पाण्याचा मारा करुन आग विझविली. मात्र यावेळी फोन करुनही अग्निशामक  विभागाचे अधिक्षक शंकर मिसाळ हे फोन उचलत नसल्याचे एका सामाजिक कार्यकत्याने  बोलताना सांगितले.
घटनेनंतर काही वेळाने अधिक्षक मिसाळ घटनास्थळी आले व आपणच गाडी पाठवून आग विझविल्याचे सांगितले. या आगीत बेग पटांगणातील भंगारासह फिरते  शौचालय जळून खाक झाले. या प्रकाराची परिसरात उलट-सुलट चर्चा सुरु होती. सध्या दिपावली सणासुदीचे दिवस आहेत. या कालावधीत अग्निशामक  विभागाच्या गलथानपणाचा कळसच म्हणावा लागेल.अशी चर्चा परिसरात सुरु होती. या आगीत महापालिकेच्या फिरत्या स्वच्छता गृहाच्या दोन वाहनांसह साहित्य  आगीत जळून खाक झाले. या आगीबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क केले जात असले तरी काही समाजकंटकाकडून ही आग लावली गेल्याची चर्चा परिसरात रंगली  आहे.