Breaking News

विनयभंग प्रकरणी फलटणच्या विद्यमान उपनगराध्यक्षाला सक्तमजूरी

सातारा, दि. 01  (प्रतिनिधी) : मागासवर्गीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी फलटणचा विद्यमान उपनगराध्यक्ष पांडुरंग मानसिंग गुंजवटे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या घटनेने फलटण शहरातील नगरपालिकेच्या राजकारणास वेगळेच वळण लागले आहे. विद्यमान उपनगराध्यक्षास शिक्षा होण्याची पहिलीच वेळ असल्याने आरोपीचे नेते हे अपयश कसे पचविणार याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिला फलटण येथील नगरपालिकेत स्वर्णजयंती शहरी रोजगार योजनेमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या दरम्यान 5 मार्च 2014 रोजी तत्कालिन नगरसेवक व विद्यमान उपनगराध्यक्ष पांडुरंग मानसिंग गुंजवटे यांनी पिडीत महिलेला नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या दालनात बोलावून घेतले. यावेळी त्या ठिकाणी फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते अनुप शहा उपस्थित होते. यावेळी गुंजवटे यांनी तुमचे काम चांगले नाही. तुम्ही लोकांकडून नाहक पैसे घेऊन त्यांची फसवणू करता. तसेच आमच्या वॉर्डात जाणीवपूर्वक लक्ष देत नाही, असे म्हणत पीडित महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पीडित महिलेने आपल्या भ्रमणध्वनीवरुन आपल्या पतीला मुख्याधिकार्‍यांच्या दालनात येण्याची विनंती केली. यावेळी पांडुरंग गुंजवटे व पीडित महिलेमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली. यावेळी गुंजवटे यांनी रागाच्या भरात पीडित महिलेला मारहाण करुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.  तसेच पीडित महिेलेची कपडे यावेळी फाडली होेती. पीडित महिला व तिच्या पतीने फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. तत्कालिन पोलीस उपअधीक्षक राहुल माकणीकर यांनी तपास करुन त्याबाबतचे आरोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले. या खटल्यात 11 साक्षिदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. ज्योती दिवाकर यांनी युक्तीवाद केला. तिसरे अतिरिक्त सत्र न्यायाधिश एन. के. चव्हाण यांनी आरोपिला 354 (ब) अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास 3 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. तसेच कलम 341 अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा, पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.