Breaking News

प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा

। राष्ट्रवादी शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने रॅली काढून प्लॅस्टिक मुक्तीचा नारा ः रेश्मा चव्हाण

अहमदनगर, दि. 27 - शहरात राष्ट्रवादी शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. प्लॅस्टिकचे अनेक दुष्परिणाम आहेत.  महिलांमध्ये खर्‍या अर्थाने जागृती झाल्यास प्लॅस्टिकचा वापर कमी होऊ शकतो. प्लॅस्टिक वापराचे तोटे काय आहेत, याबद्दल आम्ही शहरातून फेरी काढून  नागरिकांमध्ये जनजागृती केली. प्लॅस्टिकच्या वापराने पर्यावरण धोक्यात आले असून, पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकचा वापर पूर्णतः बंद व्हायला हवा.  प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा चव्हाण-आठरे यांनी केले.
राष्ट्रवादी शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्लॅस्टिक मुक्ती संदर्भात  जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी आठरे बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अविनाश घुले, संजय घुले, क्रांतिकला  अनभुले, रंजना उकिर्डे, सुरेखा कडुस, ज्योती पवार, लता गायकवाड, निर्मला जाधव, रेखा भोईटे, अपर्णा पालवे, गीता कामत, ज्योती निकम आदींसह महिला  उपस्थित होत्या.
आठरे म्हणाल्या की, माळीवाडा, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रोड, दिल्ली गेट मार्गे सिद्धीबाग येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीनंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे  यांची भेट घेऊन प्लॅस्टिकवरील बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे सांगितले.
प्रा. विधाते म्हणाले की, राष्ट्रवादी शहर जिल्हा महिला काँग्रेसने प्लॅस्टिक मुक्तीचा नारा देत काढलेली रॅली हा चांगला उपक्रम आहे. प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी  असतानाही सर्रासपणे या पिशव्या वापरल्या जातात. प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. मुक्या  प्राण्यांना धोका होऊन माणसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यासाठी प्लॅस्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.  रॅलीत महिला विविध फलक हातात घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यांनी प्लॅस्टिक मुक्तीच्या घोषणा दिल्या.