Breaking News

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’प्रमाणे एसटी महामंडळ वागू लागले


। अधिकृत थांब्यावरील उपहारगृहात एसटीच्या प्रवाशांना मिळणार 30 रुपयात चहा-नाश्ता । असुविधा झाल्यास परवाना रद्दची कारवाई 

अहमदनगर  (प्रतिनिधी)। 28 (अशोक झोटिंग)  -  ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’तसेच बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रिद वाक्याप्रमाणे एसटी महामंडळ वागू लागले  असल्याची प्रचिती येत आहे. एसटीच्या अधिकृत प्रवाशाना बसने प्रवास करतांना एसटीने दिलल्या उपहारगृहात प्रवाशाची लुट होत असल्याच्या कारणावरुन एसटी  महामंडळाच्या प्रशासनाने उपहारगृह मालकांवर कडक निर्बंध लादले आहेत. याची नुकतीच सर्वत्र माहिती देण्यात आली आहे. यासाठी वाहकामार्फत अशा प्रकारचे  पत्रक प्रवाशांपर्यंत वाटण्यात येणार आहेत. ही एसटीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे. एसटीच्या प्रवाशांना अवघ्या तीस रुपयात चहा-नाश्ताची  व्यवस्था करण्यात येणार असून दर व वस्तुंचे फलक ठळकपणे उपहारगृहात लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. काही अधिकृत एसटी थांबा उपहारगृहात  अशी फलक झळकू लागली आहेत.
एसटी महामंडळाच्या बसेस अधिकृत खाजगी थांब्यावर अल्पोपाहारासाठी थांबवल्यानंतर अवाजवी दरात खाद्यपदार्थ मिळत असल्याने प्रवाशांची लूट होते.  त्याविरोधात प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या.या संदर्भात राज्यातील बहुतांशी वृत्तपत्रांनी प्रवाशांच्या लुटीसंदर्भात वृत्त ही प्रसिध्द केले होते.  त्यानंतर काही काळ महामंडळाने, एसटीच्या चालक व वाहकांना अनाधिकृत थांब्यांवर बसेस थांबवू नयेत, असेही आदेश काढले होते. त्यानंतर प्रवाशांची लुट  करणार्‍या उपहारगृहावर कारवाई करण्यात येऊन त्यांचे महामंडळाचे परवाने रद्दही केले होते. त्यानंतर नव्याने निविदा काढून एसटीने बससाठी अधिकृत थांबा  उपहारगृहाची नेमणूक केली. त्यानुसार लांबपल्ल्याच्या बसेसाठी महामार्गावर कितीवेळ थांबायचे? या संदर्भात उपहारगृहाची नावे जाहिर केली. त्यानुसार वरील  नियमांची अंमलबजावणी होत आहे.
 महामंडळाने अधिकृत थांब्यातील उपाहारगृहात 30 रुपयांत चहा-नाश्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून ही सेवा  सुरू करण्यात आली आहे; परंतु जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी महामंडळाने आता वाहकांमार्फत ही सेवा सुरू झाल्याची माहिती  प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यासाठी या सेवेचे पत्रकच छापण्यात आले आहे.
प्रवाशांना अल्पोपाहार करण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गावरून प्रवास करताना एसटी बसेसना त्यांच्या स्थानकांव्यतिरिक्त काही खाजगी अधिकृत थांब्यावरही बस  थांबवण्याची परवानगी दिलेली असते. मात्र ज्या अधिकृत थांब्यावर प्रवाशांना अल्पोपाहार करण्यासाठी थांबा दिला जातो, त्या उपाहारगृहात खाद्यपदार्थासाठी  जास्त किंमत आकारली जाते. त्यामळे प्रवाशांची लूट होते. याबाबत अनेकदा प्रवाशांनी महामंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे महामंडळाने त्याचा अभ्यास  करून एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी 30 रुपयांमध्ये उत्तम प्रतीचा चहा-नाश्ता देण्याच्या सूचना ऑगस्ट महिन्यात एसटीच्या  वाहतूक शाखेकडून अधिकृत थांबा असलेल्या उपाहारगृहांना देण्यात आला. या सूचना देतानाच उपाहारगृहातील इतर खाद्यपदार्थांचे दरपत्रक प्रवाशांना सुस्पष्ट  दिसेल, अशा ठिकाणी प्रदर्शित करण्यात यावे, असेही स्पष्ट सांगितले होते.
महामंडळाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या नाश्तामध्ये शिरा, पोहे, उपमा, वडा-पाव, इडली, मेंदू वडा हे पदार्थ असून यापैकी एक पदार्थ प्रवाशांना घेता येणार  आहे. त्याचबरोबर चहा देखील प्रवाशांना मिळणार आहे. सध्या 22 अधिकृत थांब्यावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तर आणखी 100 थांब्यावर सेवा सुरू  करण्याचा विचार करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना कोणत्याही प्रकारची असुविधा झाल्यास त्यांच्या तक्रारीवरून संबंधित उपाहारगृहाचा परवाना रद्द  करण्यापर्यंतचीही कारवाई केली जाणार आहे. तर जादा किंमत आकारल्यास थांबाही रद्द होणार आहे, असे करारपत्रात नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, दिवाळी सणाच्या पार्श्‍वभुमीवर एसटी महामंडळाने भाड्यात सरसकट दहा टक्के वाढ केली आहे. ही सिझन दरवाढ असल्याचे सांगण्यात आले. याचा  सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसला आहे.