Breaking News

दोन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले

जळगाव, दि. 10 - सुरवातीला बर्‍यापैकी पाऊस होऊन पिके तरारली. मात्र, यंदा चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगवत असतानाच काही भागांत अतिवृष्टीमुळे पिके हातची गेली. ज्वारी काळवंडली, डोक्यावर कर्ज व त्याचे व्याज आता कसे फेडणार, या विवंचनेतून आज जळगाव तालुक्यात दोन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले.  धानवड येथील मिठाराम पाटील व आमोदे येथील नाटेश्‍वर सूर्यवंशी अशी या दोन शेतकर्‍यांची नावे आहेत. 
मिठाराम वसंत पाटील यांची धानवडला आलेली दोन एकर शेती आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे शेतात तरारलेले कपाशीचे पीक  खराब झाले, ज्वारीदेखील काळी पडून तोंडाचा घास गेला. डोक्यावर कर्ज दुप्पट होऊन घेणार्‍यांना तोंड कसे दाखवायचे, या विवंचनेत मिठाराम हे गेल्या दोन  दिवसांपासून कुणाशीही बोलत नव्हते. शनिवारी शेतातून परतल्यावर नुकसानीमुळे जेवणाचा घास घशाखाली उतरला नाही. कुटुंबावर संकट कोसळले. कुटुंबाला  हातभार लागावा, म्हणून पत्नी सुनीता आज गावातील अशोक पाटील यांच्या शेतात मजुरीला निघाली. पत्नीला मजुरीला गेली असताना मुलगा रोहन व मुलगी  जागृती दोघेही सुटी असल्याने घराबाहेरच खेळत होते. कुटुंबातील त्यावेळचा एकांत साधून मिठाराम पाटील यांनी छताला दोरी बांधत गळफास घेतला. मुलगी  घरात शिरल्यावर दुपारी दोनला वडिलांच्या गळफासाचे दृष्य पाहून तिने आरडाओरड करून शेजारच्यांना मदतीला बोलावले. गावकर्‍यांनी जिल्हा रुग्णालयात  आणल्यावर डॉक्टरांनी मिठाराम यांना मृत घोषित केले. यावेळी जमलेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला.