Breaking News

राज्यात प्रशासकीय अधिकारी अकार्यक्षम

जळगाव, दि. 10 -  राज्यातील प्रशासकीय अधिकारी कार्यक्षम नाहीत, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत, जलयुक्त शिवारची कामेही चांगली होत नाहीत, अशी व्यथा  विरोधकांनी नव्हे तर चक्क राज्याच्या कृषिमंत्र्यांनीच आज येथे व्यक्त केली. अधिकार्‍यांच्या कामाबाबत सत्ताधारी भाजपचे खासदार, आमदार केविलवाणे तर मंत्री हतबल असल्याचे यातून दिसून आले. जळगाव येथील जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतील हे चित्र होते.
पालकमंत्री नसल्याने जळगाव जिल्ह्यात नियोजन मंडळाची बैठक सहा महिन्यांपासून झाली नाही. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना  जळगावात येण्यास वेळ मिळाला नाही. अखेर नवरात्रातील अष्टमीचा मुहूर्त आणि रविवार असा मेळ करून श्री. फुंडकर जळगावात बैठकीस आले. बैठकीत  सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे खासदार ए. टी. पाटील यांनी अधिकार्‍यांच्या कामांबाबत तक्रार केली. अधिकारी सांगूनही खासदार, आमदारांची कामे ऐकत  नाहीत अशी व्यथा त्यांनी मांडली; तर भाजपचेच चाळीसगाव येथील आमदार उन्मेष पाटील यांनीही अधिकारी कोणतीही कामे करीत नसल्याची तक्रार केली.