Breaking News

अंदोरीच्या पाण्याच्या टाकीला अखेर घरघर

खंडाळा, दि. 26 (प्रतिनिधी) : खंडाळा तालुक्यातील अंदोरी या गावाला पाणीपुरवठा करणार्‍या टाक्याची दुरवस्था झाली आहे. टाकीच्या बांधकामाला तडे जाऊ  लागले आहेत. लोखंडी सळ्यांपासून बांधकामातील सिमेंटचे तुकडे पडत असल्याने या पाण्याच्या टाकीला अखेरची घरघर लागली आहे. त्यामुळे परिसरातील  लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही टाकी तातडीने पाडावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.
अंदोरी हे गाव 5 हजार लोकवस्तीचे गाव आहे. मुख्य गावठाणातील रहिवासांना पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरवस्तीत आहे. या टाकीला गेल्या काही  वर्षांपासून तडे जाऊ लागले आहेत. सध्या टाकीचे सिमेंटचे खांब उघडे पडू लागले आहेत. बांधकाम जीर्ण झाल्यामुळे टाकीचे तुकडे ढासळू लागले आहेत. लोखंडी  सळ्या मोकळ्या होत असल्याने टाकी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. या टाकीच्या परिसरात हनुमान मंदिर, शॉपिंग सेंटर, शिवाय अनेक घरे आहेत.  अपघाताने टाकी पडल्यास मोठ्या नुकसानीसह जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टाकीची होणारी दुरवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने टाकी  पाडण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.