Breaking News

करवाढीच्या निषेधार्थ सातारा आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने

सातारा, 26 (प्रतिनिधी) : परिवहन विभागाने मालवाहू व प्रवासी वाहनांवर मनमानी करवाढ केल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक  असोसिएशनच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी असोसिएशनच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय  धायगुडे यांना निवेदन देण्यात आले. 
रस्ता सुरक्षा करवाढ रद्द झालीच पाहिजे. बेकायदेशीर कामे करणार्‍या अधिकार्‍यांचा धिक्कार असो. अशा घोषणांनी आरटीओ कार्यालय परिसर दणाणून सोडला  होता. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, धनजंय कुलकर्णी, आण्णा वायदंडे, माल व प्रवासी वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि. 24  ऑक्टोबरपासून लागू होत असलेल्या रस्ता सुरक्षा निधीच्या नावाखाली वसूल करण्यात येणार्‍या उपकरास वाहतूक संघटनेचा विरोध आहे. कारण शासनाने  आतापर्यंत मोटार वाहनांवर वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारून कोणत्याही सुविधा व सवलती न देता दरवाढ केली आहे. तसेच वाहनांच्या विम्यांच्या रकमेमध्ये  भरमसाठ वाढ केली आहे. तसेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दंडाची आकारणी करण्यात येत आहे. ती अन्यायकारक आहे. जी वाहने योग्यता प्रमाणपत्र  संपलेली असतानाही सुरू आहेत, अशी वाहने तपासून त्यांच्याकडून दंड आकारण्यात यावा. शासनाने प्रथम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात नंतरच करवाढीचा  विचार करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
महामार्गावर कोणत्याही सुविधा नाहीत. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहने चालत आहेत. त्यांच्यावर आरटीओ पथक काय कारवाई करते.  वाहनचालकांना आरटीओ कार्यालयाने त्रास दिला तर  मोठे आंदोलन छेडले जाईल. आरटीओ कार्यालयात कोणतेही रजिस्टर मेन्टेन केले जात नाहीत. सर्वत्र  सावळा गोंधळ सुरू असून वेळ पडल्यास आरटीओ कार्यालयाचे कामकाज बंद करण्याचा इशारा प्रकाश गवळी यांनी दिला.