नगरपालिका निवडणुकीत शिवसंग्राम स्वबळावरच उतरणार
बीड , दि. 24 - भारतीय जनता पक्षाची शिवसंग्राम पक्षाबाबतची एकूण भूमिका पाहता बीड जिल्ह्यातील सहाही पालिका निवडणुका शिवसंग्राम स्वबळावरच लढविणार असा निर्णय घेतला असल्याचे शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अन्य ठिकाणी मात्र युती करण्याबाबत अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रदेश सरचिटणीस दिलीप गोरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सुहास पाटील, अशोक लोढा, डॉ. रमेश पानसंबळ, अनिल घुमरे यांची उपस्थिती होती. राज्यात 50 ठिकाणी शिवसंग्राम लढणार असल्याचेही मेटे यांनी यावेळी सांगितले. बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत युती करून दगाफटका झाल्याची टीका त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता केली. क्षीरसागर बांधवातील भांडण हे लुटूपुटीचे असून सत्ता आपल्या हातात कायम ठेवण्याचा हा एक डाव असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसंग्रामचे उमेदवार ठरविण्यासाठी कार्यक्रम जाहीर करताना ते म्हणाले की, नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत. 26 रोजी सहाही पालिकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून 27 रोजी उमेदवारांची अंतिम नावे जाहीर करण्यात येतीले. 28 व 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.