जालना नगरपालिका निवडणुकाबाबत दोन काँग्रेसमधील बोलणी फिसकटली
जालना, दि. 24 - जालनानगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, 27 नोव्हेंबर रोजी होणा-या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर युती आणि आघाडीसाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जागा वाटपाबाबत शुक्रवारी तब्बल तीन तास बैठक झाली. पाच जागांवरुन मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटल्याचे सूत्रांनी सांगितले. जालना शहरातील वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार 60 वॉर्ड झाले असून, 30 प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात दोन वॉर्ड याप्रमाणे शहराची रचना करण्यात आली आहे.विशेष म्हणजे यंदा पालिकेत पन्नास टक्के महिलांची संख्या राहणार आहे. तसेच नगराध्यक्ष पद हेही सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव होऊन तेही जनतेतून निवडले जाणार असल्याने प्रस्थापितांनी चाचपणी सुरु केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज विक्री आणि मुलाखतींचा कार्यक्रमही सुरु केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 20 जागांची मागणी केली तर काँग्रेस नेत्यांनी 15 जागांवर सहमती दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीने दावा केलेल्या पाच जागांवर काँग्रेसचे सिटींग नगरसेवक असल्याने पेच निर्माण झाला.