पाकची ‘शस्त्र’ क्रिया!
दि. 01, ऑक्टोबर - उरी हल्लयानंतर देशभर पाकबद्दल मोठया प्रमाणात प्रत्येक भारतीयांच्या मनात राग, चीड, रोष खदखदत होता. पाक आपल्या भूमीत दहशतवादाला खतपाणी घालत होता, आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेकवेळेस पाकला समजवण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात आला तरी पाकची खोड जाईल तरच नवल. त्यामुळे पाकला त्यांच्याच भूमीत शिरून दहशतवाद्यांचे स्थळ उद्धवस्त करण्याची मागणी अनेक तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कणखरपणा दाखवत पाकला त्यांची जागा दाखवून देत पाकविरोधात सर्जिकल स्ट्राईक्स (नियंत्रित हल्ले) करण्याची रणनिती आखण्यात आली. लष्कराने पहिल्यांदाच लाइन ऑफ कंट्रोल ओलांडून पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उध्वस्त करण्याची कामगिरी फत्ते केली, ज्यात 38 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले. यावेळी पंतप्रधांनांनी आपल्या उदार व्यक्तीमत्वाचे दर्शन घडवत सर्जिकल स्ट्राईक्स करण्यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं, यांच्यासह विविध नेत्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. अर्थात आपण पाकला चोख उत्तर दिले असले, तरी पाक मात्र सहजासहजी शांत बसणारा नाही.त्यासाठी आपणास मोठया प्रमाणात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण पाकने आतापर्यंत 20 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. आणि भारताने ते प्रत्येक वेळेस परतवून लावत, आपल्या सहनशक्तीचे दर्शन घडवले होते. त्यामुळे दहशतवाद्यांची मजल प्रत्येक वेळेस वाढत चालली होती. उरी हल्ला तर भारतीयांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे पाकला धडा शिकविण्याची मागणी प्रत्येक थरातून होत होती. असे असले तरी युध्द आपल्याला परवडणारे नक्कीच नव्हते. त्यामुळेच पाकची कोंडी कशी करता येईल आणि नियत्रिंत हल्ले कसे करता येईल याचीच चाचपणी अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर ‘सर्जिकल स्ट्राईक’ ची रणनिती आखत पाकमधील अनेक दहशतवादी तळ उध्दवस्त करण्यात आले. ‘सर्जिकल स्ट्राईक’ च्या वेळी अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने लष्करी कारवाई करण्यात येते. या कारवाईमध्ये जे टार्गेट असते त्यांच्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोहचणार नाही याची काळजी यामध्ये घेतली जाते. त्यामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’ मुळे कमी वेळेत, थेट आणि नेमकेपणे पाकला उत्तर देण्यात आले. पाकच्या अतिरेकामुळे आज पाकची चहूबांजूनी कोंडी झाली आहे. भारत-पाकिस्तानमधील सिंधू नदी पाणीवाटप करारावर फेरविचार करण्याचा इशारा दिल्यानंतर, आता पाकिस्तानसोबतचा शस्त्रसंधी करार तोडण्याचा विचार भारत करत आहे. भारताने आता पाकची कोंडी केल्यामुळे पाक आता चांगलाच धास्तावलेला दिसून येत आहे. त्यामुळे आतातरी पाकने त्यांच्या भूमीतील दहशतवादाला पोसणे बंद केले पाहिजे. अन्यथा पुढील काळ हा पाकसाठी भयावह असू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी सर्वच देशांचे एकमत झाले आहे. अपवाद फक्त पाकिस्तान, आणि त्याला मदत करणारा चीन, यांची आढयातखोर भुमिका ही आंतरराष्ट्रीय स्तरावर डोकेदुखी ठरणारी असली तरी, जागतिक स्तरावर सर्व देश दहशतवादाविरोधात एकवटल्यामुळे दहशतवादांना आश्रय देणार्या देशांना एकटे पाडण्याची गरज आहे. भारताचे संरक्षण बजेट हे चार हजार कोटी डॉलर आहे, तर पाकिस्तानचे संरक्षण बजेट केवळ 700 कोटी डॉलर. भारताच्या सैन्यदलात तब्बल 2 कोटी 30 लाख सैनिक आहेत, तर पाकच्या सैनिकांचा आकडा फक्त 43 लाख. त्यातले भारताचे सीमेवरचे सैनिक आहेत 13 लाख, तर पाककडे फक्त 6 लाख 20 हजार. भारताकडे 6 हजार 500 रणगाडे आहेत, तर पाकिस्तानकडे 3 हजार. भारताच्या ताफ्यात 7 हजार 500 तोफा आहेत, तर पाकिस्तानच्या ताफ्यात अवघ्या 3 हजार तोफा. भारताकडे 300 मिसाईल्स आहेत, तर पाकिस्तानकडे 130जमिनीवर आपण पाकिस्तानपेक्षा चौपटीने ताकदवान आहोतच. पण आकाशातही पाकिस्तान भारतासमोर ठेंगणे आहे. असे असतांना भारतासारख्या बलाढय लष्कर असलेल्या देशावर पाककडून नेहमीच छुपे दहशतवादी हल्ले करण्यात येत आहेत. कारण भारताची सहनशक्ती. हल्ला परतवून लावणे. प्रतिउत्तर न दिल्यामुळेच पाक शेफारला होता. त्याची हिम्मत वाढत चालली होती. मात्र ‘सर्जिकल स्ट्राईक’ च्या हल्लयामुळे आता तरी पाक ताळयावर येईल का ?हे येणार्या काळातच कळेल.
