Breaking News

राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी शेखर गोरेंनी जाणून घेतले कार्यकर्त्यांचे मत

म्हसवड, दि. 26 (प्रतिनिधी) : रासपचे अध्यक्ष व मंत्री महादेव जानकर यांनी दुष्काळी माण-खटाव तालुक्यातील मतदारसंघात कोट्यावधी रूपयांची विकासकामे  देऊन दुष्काळी भागाला न्याय देण्याबरोबर कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज असताना वेळकाढूपणाचे धोरण अवलंबल्याने आपण कार्यकर्त्यांना विचारात घेऊन  सर्वसामान्य जनतेचे हित पाहणार्‍या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीच्या माध्यमातून सातारा-सांगली विधान परिषदेची  निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन शेखर गोरे यांनी केले आहे.
माण तालुक्यातील दहिवडी येथील माऊली मंगल कार्यालयात माण-खटाव तालुक्यातील शेखरभाऊ गोरे प्रेमी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत  होते. रासप पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याअगोदर प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.
शेखर गोरे म्हणाले, विधानसभा निवडणूकीत महायुतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर माण-खटावच्या जनतेने अल्पावधीत 53 हजाराच्यावर मते देऊन माझ्यावर  विश्‍वास टाकला होता. राज्यात व देशात महायुतीची सत्ता आल्याने रासपच्या माध्यमातून जानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी माण-खटाव तालुक्याचा  सर्वांगीण विकास साधण्याचे ध्येय ऊराशी बाळगून काम करत होतो. मात्र, जानकर साहेब मला आमदार होऊ दे, मंत्री होऊ दे मग तालुक्यात विकासगंगा चालू  करू, असे सांगत होते. आमदार होऊन 16 महिने झाले, मंत्री झाले त्यानंतर दुष्काळी भागाच्या विकासकामासाठी पाठपुरावा करत राहिलो. मात्र, त्यांच्या  वेळकाढूपणा टोलवाटोलवी धोरणामुळे त्यांच्याकडून अपेक्षाभंग होत राहीला. सत्ता आल्यानंतर मी पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी बोललो तर  ते म्हटले आताच काही नको नंतर पाहू, असे सांगून गोरे म्हणाले, विधानसभा, ग्रामपंचायत, सोसायट्या, मार्केट कमिटीच्या निवडणूकीत आपण उज्ज्वल यश  मिळवले. या यशात राष्ट्रवादी पक्षाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्यानेच आपण निवडणूका जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष सर्वसामान्य जनतेचे हित पाहणारा  पक्ष असून जनतेच्या हितासाठी आपल्याला आज निर्णय घ्यायचा असून तुम्ही माझ्यावर विश्‍वास टाकला आहे आजही तुम्हीच सांगा कोणता निर्णय घ्यायचा  त्यावर कार्यकर्त्यांनी हात वर करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेऊ या असे सांगितले. सातारा-सांगली विधान परिषदेची संधी दिली असून ही उमेदवारी  तुमच्या प्रेमाची असल्याची सांगून जनतेच्या न्यायासाठी आक्रमक, भावनिक, प्रेमळ, संयमी नेता तुम्हीच बनवले असून आजपर्यंत दिलेली साथ अशीच द्यावी, असे  भावनिक आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगतातून शेखर गोरे यांच्या स्वखर्चाने केलेल्या विकासकामाबद्दल व त्यांच्या प्रेमाबद्दल मते मांडून तुमच्या निर्णयाबरोबर आम्ही सदैव राहू  असे सांगितले.