Breaking News

इनामदार कॉलेजमध्ये ’टाकावूपासून टिकावू’ वस्तूंचे प्रदर्शन

। शो पीस ते आकाश कंदिलपर्यंतची नावीन्य । पर्यावरण आणि प्रदूषण विषयावर जनजागृती

पुणे, दि. 27 - आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाच्या  ’इको  क्लब’ च्या वतीने  ’टाकाऊपासून  टिकाऊ’  या  संकल्पनेंतर्गत प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन  पुणे  महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी अश्‍विनी शितोळे यांच्या  हस्ते झाले. यामध्ये सुमारे  150  विद्यार्थिनींनी टाकाऊ  वस्तू, प्लास्टिक, कागद  यापासून अत्यंत सुबकतेने  तयार केलेल्या वस्तू या  प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या होत्या.  हे प्रदर्शन आझम  कॅम्पस येथे भरविण्यात आले होते, अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य गफार सय्यद यांनी पत्रकाद्वारे दिली. 
प्रदर्शनात टाकाऊ प्लास्टिकपासून  आकाश कंदील,  प्लास्टिक बाटल्यांपासून  फॅन, बाटल्यांच्या झाकणांपासून,  पिस्ता,  शेंगांच्या टरफलांपासून  विविध ’शो  पीस’, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले ’शो पीस’, तुटलेल्या काचांच्या तुकड्यांपासून ’फ्रेम’ अशाप्रकारच्या विविध वस्तूंचा समावेश यामध्ये होता.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार  यांनी  प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. आबेदा इनामदार ज्युनिअर  कॉलेज फॉर गर्ल्स महाविद्यालयाच्या प्राचार्या आयेशा शेख, उपप्राचार्य गफार सय्यद आणि संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाची संकल्पना आणि  मार्गदर्शन महाविद्यालयाच्या पर्यावरण शिक्षिका आसमा मुजावर यांनी केले होते.
बदलत्या काळात पर्यावरणातील होणारे असंतुलन आणि प्रदूषण याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणे, हा या  प्रदर्शन भरवण्या मागचा मुख्य हेतू होता असल्याचे यावेळी प्राचार्य आएशा शेख यांनी अवर्जुन सांगितले आहे.