Breaking News

तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे कुटूंब व्यवस्था धोक्यात

। वीज कामगारांच्या गुणवंत पाल्याच्या  सत्कार समारंभात डॉ.संजय कळमकर यांचे प्रतिपादन ।   

अहमदनगर (प्रतिनिधी) । 26 - तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे कुटूंब व्यवस्था धोक्यात आली आहे. पालकच मालिकांच्या व मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे मुलांवर  संस्कार कोणी करायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कुटूंबात चार माणसे असतील तर सहा मोबाईल आहेत. भिंतीवर लाख रुपयांच्या एलईडी आहे. पण पन्नास  रुपयांचे साधे वाचनिय पुस्तक नाही, असे कुटूंब सुशिक्षित असले तरी सुसंस्कृत असेलच याची शास्वती देता येत नाही, असे प्रतिपादन डॉ.संजय कळमकर यांनी  केले.
अहमदनगर जिल्हा वीज कामगार पतसंस्थेने आयोजित केलेल्या वीज कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार व सेवानिवृत्त सहकार्याचा गुण गौरव  कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, वीज कामगार पतसंस्थेने गुणवंत पाल्यांना दिलेल्या प्रेरणेने भविष्यात यश मिळवण्यास उभारी मिळेल.राजकारणाबाबत  बोलतांना ते म्हणाले, राजकारण करणे हा भारतीय माणसाचा स्थायी स्वभाव आहे. बाहेर राजकारण केल्याने मनाचा निचरा होतो; नाहीतर घरात राजकारण  करणारे घरे फोडतात.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांनी संस्थेच्या कार्याची व विकासाची माहिती दिली. वीज कामगार राज्य संघटनेचे सचिव जहिरोद्दिन सय्यद  यांनी राज्यस्तरावरील संघटनेच्या कार्याचा आढावा घेत बोनस वा सानुग्रह अनुदान याबाबत  कामगार बंधूंना माहिती दिली.
यावेळी सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब वाकडे, रावसाहेब मोरे, सतीश भुजबळ, रघुनाथ लाड, इब्राहिम हवालदार, अविनाश भोसले यांच्या हस्ते  निवृत्त सहकारी कामगारांचा सपत्नीक गुणगौरव करण्यात आला तर पतसंस्थेचे नंदकिशोर राऊत, प्रविण जठार, सचिन मुळे, मनिषा पाठक, सुशिला तेलुरे, अमोल  गारुडकर, श्यामराव मेने, अशोक साळूंके यांच्यासह संचालकांच्या हस्ते जिल्हाभरातून आलेल्या वीज कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार  करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाथरकर यांनी केले तर शेवटी आभार व्यवस्थापक शहनवाज खान यांनी मानले.