Breaking News

अगस्तीची साखर चोरणारे 3 ट्रकचालक राजस्थानात जेरबंद

। एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कामगिरी । 21 टन साखरेसह ट्रकही हस्तगत । 

 अहमदनगर (प्रतिनिधी)। 26 - अकोले तालुक्यातील  माजी मंत्री  मधुकरराव पिचड यांच्या अगस्ती सहकारी  साखर कारखान्याची साखर चोरणार्‍या तीन  ट्रकचालकांना राजस्थानातून पकडून सोमवारी (दि. 24) रात्री उशिरा नगरला आणले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या काही साखरेसह मालमोटारही हस्तगत  करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांत 21 टन साखर चोरणार्‍याचा छडा लावला.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे फौ.नागवे, हवालदार लोखंडे व नवले या तीन कर्मचार्‍यांनी तीन आरोपींना हस्तगत केलेल्या मुद्देमालासह तब्बल 1350 किलोमिटर  अंतरावरुन नगराला आणले. जादा पोलिस कुमक नसतांनाही तीन पोलिसांनी केलेली ही कारगिरी विशेष ठरली आहे. पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांनी  एमआयडीसी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
पोलिसांनी पकडलेल्या चोरट्यांमध्ये बनवारी ऊर्फ कमलेश गोपाल वैष्णव (वय 22, रा. खेडी खुर्द, ता. शाहेपुरा, जि. भिलवाडा, राजस्थान), शिवराज  सत्यनारायण वैष्णव (वय 23, रा. एकलिंगपुरा, ता. कोटडी, जि. भिलवाडा, राजस्थान), शिवराज रामकिसन गुर्जर (वय 21, रा. घागडोरा खेडा, ता. शाहेगुरा,  जि. भिलवाला, राजस्थान) यांचा समावेश आहे.
याघटनेची सविस्तर माहिती अशी की, सुशीलकुमार पुरुषोत्तमलाल शर्मा (वय 50, हल्ली रा. विळद, मूळ रा. झुणझुणू, राजस्थान) यांचा विळदला ट्रान्सपोर्ट  व्यवसाय आहे. अगस्ती कारखान्यातील 21 टन साखर राजस्थानातील धारवाड येथे पोहोच करण्याचे भाडे त्यांना मिळाले होते. त्यांनी ही साखर पोहोच करण्याची  जबाबदारी अर्जून (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर सोपविली होती. त्याने ही साखर (आर.जे. 06, जी.ए) या क्रमाकांच्या मालमोटारीत 11 ऑक्टोबर रोजी  सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भरली. प्रत्येकी 50 किलो वजनाच्या 580 गोण्या त्यात होत्या. संबंधित चालकाने जेथे साखर पोहोच करण्यास सांगितले होते,  तेथे निर्धारित वेळेत ती पोहोच केली नाही. तसेच साखर घेऊन गेल्यानंतर चालकाने मोबाईलही बंद करून ठेवला. बराच प्रयत्न करूनही चालकाचा शोध न  लागल्याने शुक्रवारी (दि. 21) रात्री ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सुशीलकुमार शर्मा यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर  एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरविली. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला असता चोरलेली ट्रक राजस्थानात असल्याची माहिती मिळाली.  त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागवे यांच्या नेतृत्वाखालील एक पोलिस पथक राजस्थानला रवाना  झाले. राजस्थानात बराच शोध घेतल्यानंतर चालक व ट्रक पोलिसांच्या हाती लागले. रविवारी(दि.23) पोलिसांनी चालकासह तिघांना ताब्यात घेतले व चोरलेली  साखर ट्रकसह नगरला आणली. काल (दि.24) रात्री हे पथक नगरला दाखल झाले. चोरीस गेलेल्या 21 टन साखरेपैकी जवळपास 80 टक्के साखर व मालमोटार  पोलिसांच्या हाती लागली आहे.