Breaking News

जुन्नरच्या आमदारांची मुख्याधिकार्‍यांना मारहाण

पुणे, दि. 29 - जुन्नर नगरपालिका मुख्याधिकार्‍यांना मारहाण केल्यामुळे मनसेचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार शरद सोनवणो हे अडचणीत आले आहेत. जुन्नर  नगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, मुख्याधिकारी संतोष वारुळे हे निवडणूक प्रक्रियेत सहायक निवडणूक अधिकारी असल्याने घटनेचे गांभीर्य  वाढले आहे.
जुन्नर शहरात दिवाळी सण चालू असताना रस्ते खोदून गटार तयार करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आमदार शरद सोनवणो हे  नगरपालिकेच्या प्रचारानिमित्त गेले. आठवडाभर जुन्नरमध्ये तळ ठोकून आहेत. काही नागरिकांच्या तक्रारीनंतर आमदार सोनवणे यांनी पणसुंबा पेठ येथील सुरू  असलेल्या कामावर भेट दिली. नागरिकांच्या तक्रारीनंतर आमदारांनी मुख्याधिकार्‍यांना कामाच्या जागेवर बोलावले. मुख्याधिकार्‍यांनी आचारसंहितेचे कारण सांगत  येण्यास नकार दिला.आमदार सोनवणो यांनी नगरपालिकेत धाव घेऊन मुख्याधिकार्‍यांना जाब विचारला त्या वेळी आमदारांनी संतप्त होत मुख्याधिकार्‍यांना मारहाण  केली, असा आरोप मुख्याधिकार्‍यांनी केला. तर आमदार शरद सोनवणो यांनी मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे. जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचे वृत्त  पसरताच मोठी गर्दी उसळली. मुख्याधिकार्‍यांना मारहाण केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दरम्यान, घटनास्थळी प्रांत तथा  निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी भेट दिली.