Breaking News

मनोमीलन दुभंगले; आ. श्री. छ. शिवेंंद्रसिंहराजे भोसले यांची घोषणा

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासन, जिल्हा नियोजन यासह विविध योजनांच्या माध्यामातून निधी उपलब्ध करुन  सातारा शहराचा विकास अखंडीत ठेवला आहे. आता नगराध्यक्षपद पाच वर्षांसाठी असून या पदावर कार्यक्षम आणि कर्तबगार महिला असावी याच उद्देशाने  सर्वानुमते श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे यांना नगरविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. वेदांतिकाराजे यांच्या रुपाने स्वतंत्र विचाराचा, कार्यक्षम, कार्यतत्पर  आणि कर्तबगार नगराध्यक्ष सातारा शहराला मिळणार असून सातार्‍याचा विकास झपाट्याने होईल. गेल्या 10 वर्षापासून साविआ व नविआचे मनोमिलन होते, मात्र,  या निवडणूकीत मनोमीलनास साविआकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आपण सर्व जागा लढविणार असल्याचे नगरविकास आघाडीचे नेते आ. श्रीमंत छ.  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज जाहीर केले.
येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणावर नगरविकास आघाडीच्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या  उमेदवार सौ. वेदांतिकाराजे भोसले, पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य रामचंद्र बल्लाळ, रामभाऊ साठे, निळकंठ पालेकर, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, जाकीर बागवान यांच्यासह  अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, विद्यमान सदस्य जितेंद्र सावंत, राजू भोसले, पंचायत  समितीच्या सभापती सौ. कविता चव्हाण, माजी सभापती धर्मराज घोरपडे यांच्यासह आघाडीचे सर्व जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
आ. भोसले म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने संपुर्ण मराठा समाज एकत्र होताना दिसत आहे. अशावेळी गेली 10 वर्षापासून अखंडीत असलेले  राजघराण्याचे मनोमीलन समोरुन प्रतिसाद न मिळाल्याने दुभंगले गेले असून मराठ्यांच्या मुख्य घराण्यात दुफळी झाल्याचे चित्र दिसत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात  महत्व असलेल्या राजघराण्यातील दुफळी टाळण्यासाठी अगदी कालपर्यंत आम्ही प्रतिसादाची वाट पहात होतो. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने आमच्या  कुटुंबातील वरिष्ठ श्रीमंत छ. शिवाजीराजे आणि श्रीमंत छ. चंद्रलेखाराजे यांच्या आदेशानुसार आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून दोघांनीही आम्ही सर्व  कुटूंबीय तुमच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. मी कालपर्यंत मनोमिलन होण्यासाठी सकारात्मक होतो. आता वेळ निघून गेली असून समोरुन कोणतीही चर्चा  अथवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे मनोमिलन खंडीत होत असून मराठ्यांच्या अस्मितेला हानी पोहचणार असल्याची खंत व्यक्त करून फर्स्ट  इंम्प्रेशन इज लास्ट इंम्प्रेशन याप्रमाणे वेदांतिकाराजे यांचा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली ताकद दाखवून देवू या, असे भावनिक आवाहन आ.  शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.