Breaking News

केंद्र व राज्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आणू

अहमदनगर, दि. 29 - मनपाच्या तिजोरीत या अगोदरच्या सत्ताधारी विरोधी पक्षाने खडखडाट करून ठेवला आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. अशा  परिस्थितीत मनपाच्या माध्यमातून शहराचा विकास करणे खूप जिकिरीचे होणार आहे. केंद्रात व राज्यात युतीची सत्ता असून, मोठा विकासनिधी आणून शहराचा  सर्वागीण विकास करू. नवनवीन प्रकल्प नगरला आणण्यासाठी जातीने लक्ष देणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
प्रभाग 4च्या नगरसेविका आशाताई बडे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचा शुभारंभ श्री. राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. राठोड बोलत होते.  याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, स्थायीचे सभापती सचिन जाधव, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी सभागृहनेते अशोक बडे, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राजेंद्र  दळवी, नगरसेविका सुनीता भिंगारदिवे, सुनील खामणेकर, भाऊसाहेब खेडकर, जगन्नाथ भोर, डॉ. जयंत शिंदे, अंबादास कराळे, भीमराज आव्हाड, बबन  कोतकर, मदन आढाव, मनोज प्रभुणे, बाळासाहेब बडे, शेलार, नवनाथ पवार, दत्तात्रय कोलसे, बाळू मुंगसे, मेटे तांबे, इंजि. सोनटक्के, पारखे उपस्थित होते.
राठोड पुढे म्हणाले की, या भागातील नागरिक नेहमीच शिवसेनेबरोबर राहिली. अशोक बडे यांनी या भागात खर्‍या अर्थाने विकास केला. मनपाने विकासकामे  करताना त्याच्या दर्जाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. रस्ते 6 महिने नाही, तर कमीत कमी 10 वर्षे तरी टिकायला हवीत. चांगली कामे करा,  थातूरमातूर कामे करू नका. मनपाने चांगल्या पद्धतीने खड्डे बुजविल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रा. गाडे म्हणाले की, श्री. राठोड यांच्यामुळेच शहराचा विकास झाला. त्यांनी उपनगरांत केलेल्या विकासकामांमुळेच शहरातील उपनगरे वाढण्यास मदत झाली.  खड्डे बुजविण्यासाठी मोर्चे काढणार्‍यांना कोणामुळे खड्डे झाले हे माहीत आहे. खड्डे तुम्ही करायचे व बोंब आमच्या नावाने मारायची. खड्डे तर आम्ही बुजवूच. पण  खड्डे बुजविण्यासाठी मोर्चे काढणार्‍यांना लवकरच शिवसेना त्यांची जागा दाखवून देईल, असे ते म्हणाले.
महापौर कदम म्हणाल्या की, या भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एकीकडे घरंदाज लोक महापौर होतात. मात्र, शिवसेनेत सर्वसामान्यांना  महापौरपदाची संधी मिळते. शहरात दर्जेदार कामे करणार आहोत. येथील विविध विकासकामांना महापौर शीलाताई शिंदे यांच्या काळात मंजुरी मिळाली होती, असे  सांगितले.
अशोक बडे म्हणाले की, हॉटेल चैतन्य क्लासिक ते गांधीनगर रस्ता, माताजीनगर अंतर्गत, साईश्रद्धा अंतर्गत व अंकुर कॉलनी अंतर्गत मजबुतीकरण व डांबरीकरण  या कामांना आज शुभारंभ करण्यात आला. प्रभागात जाहीरनाम्याद्वारे जी आश्‍वासने दिली. ती आपण पूर्ण केली आहेत. पुढील काळात विकासकामांच्या  माध्यमातून या भागाचा कायापालट केला जाईल. आपण मंजूर करून घेतलेली काही कामे सत्ताधारी विरोधकांनी मागील काळात रद्द  केली. जनतेच्या कामात  आडकाठी आणण्याचे पाप त्यांनी केले. मात्र, आता मनपात युतीची सत्ता आली असून, ही कामे मार्गी लावूच, असे ते म्हणाले.