व्यापार्यास लुटणार्या चौघास अटक
प आष्टा, दि. 14 - वाळवा येथील चौघांनी वाळवा - अहिरवाडी फाट्यावर कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील झेंडू व्यापार्याला 50 हजार रोख रक्कमेसह सोन्याची चेन, मोबाईल आदी एक लाख पाच हजाराला गंडा घातला. लखन बाळू जैताळकर (सोंगेवाडी, कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सापळा रचून सागर शामराव गोईंगडे (26), राहुल अमर थोरात (24), सचिन सुभाष चव्हाण (24), तोफिक मुजावर (सर्व वाळवा, ता. वाळवा) यांना अटक केली. त्यांच्याकडून 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कणकवलीतील तेजस एंटरप्रायजेसचे लखन जैताबकर आष्टा-वाळवा परिसरात झेंडूची फुले खरेदीसाठी टाटा झेनॉन टेम्पो (एमएच 07 पी 1270) घेऊन फिरत होते. सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास चौघांनी जैताळकरांची भेट घेतली. त्यांना 250 किलो झेंडूची फुले 25 रुपये दराने होलसेल दरात देतो, असे आमिष दाखवून भूलथापा देऊन वाळवा-अहिरवाडी रस्त्यावरील ओढ्यावरिल पुलाकडे नेले. तेथे चाकूचा धाक दाखवून भीती घातली. शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. गळ्यातील तीन तोळ्यांची, सोन्याची चेन काढली. पँटच्या खिशातील 50 हजार रोख रक्कम, दोन मोबाईल संच, असा एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल हिसकावून जबरदस्तीने पळवून नेला. भीतीने जैनाळकर यांनी आष्टा पोलिस ठाणे गाठले. तेथे अज्ञातांविरुद्ध फिर्याद दिली. आष्ट्याचे हवालदार अरुण पाटील, नितीन पाटील, चंदू माने यांनी फिर्यादीच्या मदतीने परिसरात सापळा लावला. त्यांनी सागर गोईंगडे, राहुल थोरात, सचिन चव्हाण, तौफीक मुजावर यांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून सोन्याची चैन, मोबाईल, 50 हजारपैकी 30 हजार रुपये असा 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
