Breaking News

सुभाषनगरमधील चौघांना मोका

सांगली, दि. 14 - लूटमार, हल्ले, जबरी चोरी, धमकावणे, मारामारी, दरोडा, अवैध हत्यारे बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असणार्‍या अभिमान उर्फ बाळू माने याच्यासह त्यांच्या तीन साथीदारांवर मोक्कांतर्गंत कारवाई करण्यात आली आहे. यासाठी विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी परवानगी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अभिमान माने, परशराम लोखंडे, जितेंद्र लोखंडे (तिघेही रा. पाण्याच्या टाकीजवळ, सुभाषनगर, मिरज), भीमराव तम्मान्ना नंदीवाले (45, रा. नंदीवाले वसाहत सुभाषनगर, मिरज) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नांवे आहेत. दत्तात्रय माने (रा. तासगांव फाटा) याने अभिमान मानेकडून वीस हजार रुपयांची वाळू विकत घेतली होती. त्यापैकी दहा हजार रुपये सचिनने बाळूला परत दिले होते. उर्वरित दहा हजार रुपयांच्या बदल्यात बाळूच्या सांगण्याप्रमाणे ट्रकच्या कॅरिअरसाठी घरातील लोखंडी अंगल दिले होते. तरीही 2 सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास सर्व संशयितांनी वाळूचे शिल्लक राहिलेले पैसे परत कधी देणार असे म्हणत शिवीगाळ करीत सचिनला काठी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी बाळूने त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोख 2 हजार 700 रुपये काढून घेतले होते.याप्रकरणी सचिनने फिर्याद दिल्यानंतर सर्व संशयितांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चौघांच्या टोळीने आतापर्यंत आठहून अधिक गंभीर गुन्हे संघटितरित्या केल्याने त्यांच्यावर मोक्कांतर्गंत कारवाईसाठी विशेष महानिरिक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला नांगरे-पाटील यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता चौघांवर मोक्कांतर्गंत कारवाई करण्यात येणार आहे. याचा पुढील तपास उपअधिक्षक धीरज पाटील हे करीत आहेत.