Breaking News

सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश जाधव

पुसेगाव, दि. 29 (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन पदी डॉ. सुरेश सर्जेराव जाधव यांची बिनविरोध  निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या पंचवार्षिक निवडणुकीत 6 विश्‍वस्त जागांसाठी श्री सेवागिरी नागरिक संघटना, श्री सेवागिरी जनशक्ती संघटना,  श्री सेवागिरी ग्रामविकास संघटना प्रत्येकी 6 व अपक्ष असे 19 उमेदवार रिंगणात होते. डॉ. सुरेश जाधव, मोहनराव जाधव व सुनीलशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली  श्री सेवागिरी नागरिक संघटनेने हायटेक प्रचार यंत्रणा राबवून 6 जागांपैकी चार जागा जिंकून सत्ता कायम ठेवली. तर उपसरपंच रणधीर जाधव यांच्या  नेतृत्वाखालील श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेला दोन जागा जिंकता आल्या. श्री सेवागिरी ग्रामविकास संघटनेला एकही जागा जिंकता आली नाही.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट कार्यालयात मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन निवड प्रक्रियेसाठी बैठक घेण्यात आली. चेअरमन  पदासाठी श्री सेवागिरी नागरिक संघटनेतून डॉ. सुरेश जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जासाठी सूचक विश्‍वस्त योगेश देशमुख तर विश्‍वस्त  प्रताप जाधव यांनी अनुमोदन दिले. तर विरोधी असणार्‍या विश्‍वस्त रणधीर जाधव व सुरेशशेठ जाधव यांनी चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे  डॉ. सुरेश जाधव यांची श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली असल्याचे सुंदरगिरी महाराज यांनी घोषित केले. यावेळी नूतन  विश्‍वस्त मोहनराव जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव उपस्थित होते.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, राज्यासह देशात श्री सेवागिरी महाराजांचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना  शेतीविषयक माहिती मिळावी यासाठी ट्रस्ट राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेची व्याप्ती वाढावी व यात्रा काळात  भाविकांना जास्तीत-जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. श्री सेवागिरी महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविक भक्तांंच्या गाडी पार्किंगची सोय  केली जाणार आहे.