Breaking News

ऊसाला अंतिम भाव 5 हजार द्या ः रघुनाथदादा

सांगली, दि. 26 - सरकारने ऊसाचा पहिला हप्ता साडेतीन हजार व अंतिम भाव पाच हजार जाहीर केल्याशिवाय राज्यात ऊसतोड करु दिली जाणार नाही, असा इशारा शेतरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.
मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऊस, कांदा व दूध परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. ते म्हणाले, मतदारांनी यापूर्वी चार वेळा सरकार बदलून पाहिली. मात्र, कोणत्याही सरकारने शेतकरी विरोधी धोरणांमध्ये बदल केला नाही. सरकारी कर्मचार्‍यांनी विविध वेतन आयोगांमार्फत आपले पगार वाढवून घेतले आहेत. सर्व आमदार, खासदार तसेच माजी आमदारांनी आपल्या वेतन व भत्यांमध्ये वाढ करुन घेतली आहे. सरकारी तिजोरीमधून पैसा मिळविणार्‍यांपैकी कुणीही त्यांचे भागल्यामुळे शेतकर्‍यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा, असे बोलत नाही. आपल्या मतांवर निवडून आलेले आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर राहिले नाहीत. त्यामुळेच अमित शहासारखा माणूस बळिराजाला पाताळात गाडणार्‍या वामनाची जयंती साजरी करण्याची भाषा बोलतो. गोवंश हत्याबंदी कायद्याबद्दल रघुनाथ दादा पाटील म्हणाले, दुधाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांपुढे या कायद्यामुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्या गोठ्यांमध्ये जन्म घेणार्‍या जर्सी गोर्‍ह्यांचे काय करायचे ? हा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आहे. हे गोर्‍हे फुकटात सोडून द्यावे लागत आहेत. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याला बाजारभाव मिळत नाही. या सर्व शेतकरीविरोधी धोरण राबविणार्‍या पुढार्‍यांविरोधात शेतकर्‍यांनी दांडकी घेऊन उभे राहावे.