Breaking News

गट-गणाच्या 45 हरकतीवर 17 नोव्हेंबर रोजी सुनावणी

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) - सातारा जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणासाठी 45 हरकती व सूचना जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल झाल्या असून या  हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्तांकडे दि. 17 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या 64 गट व पंचायत समितीच्या 128 गणाची आरक्षणे जिल्हाधिकार्‍यांनी सादर केली. त्यानंतर दि. 10 ते 20 ऑक्टोबरपर्यंत  जिल्हाधिकार्‍यांकडे हरकती व सूचना सादर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी हरकती दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी 25  व पंचायत समिती गणासाठी 20 अशा मिळून 45 हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. प्रामुख्याने लगतची गावे गट गणात समाविष्ठ करावीत,  अशा सूचना आल्या आहेत.
आलेल्या सर्व सूचना व हरकतीवर गुरुवार दि. 17 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होवून गट व गणाची रचना अंतिम करण्यात येणार आहे.  दि. 25 नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.