Breaking News

जिल्हा परिषदेच्या मैदानावरून होणार मोर्चाला प्रारंभ : पाटील

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : सातारा येथे मराठा समाज बांधवांचा मराठा मूक मोर्चा सोमवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मैदानावरून सुरू होणार आहे. तेथून तो पुढे नवीन आर. टी. ओ. ऑफिस, सिव्हील, एसटी स्टँड चौक, राधिका रोड, मोती चौकमार्गे राजपथावरून पोवई नाका असा जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  मोर्चासाठी शहर परिसरात एकूण 43 पार्किंग झोन राहणार असून तब्बल 28 ठिकाणी मराठा बांधवांना उतरण्याची सुविधा करून 8 ठिकाणी ते एकत्रित जमणार आहेत. दरम्यान, महिलांसाठी जिल्हा परिषद मैदान, शाहू स्टेडियम, कला व वाणिज्य कॉलेज, गांधी मैदान तर पुरुषांना सैनिक स्कूल मैदान, पोलीस परेड मैदान, कोटेश्‍वर व राजवाडा बसस्थानकावर थांबण्याची सोय करण्यात आली आहे.
सातार्‍यातील मोर्चासाठी जोरदार तयारी झाली असून संयोजन समिती, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणांनी एकत्रितपणे मायक्रो प्लॅनिंग केले आहे. गेल्या आठवड्यापासून पोलीस मोर्चामार्गाबाबत बैठका, रस्ते पाहणी करत आहेत. यामुळे मोर्चाचा मार्ग, पार्कींगची व्यवस्था, पुरुष, महिलांनी कुठे एकत्रित यायचे याबाबतची जिल्ह्याला उत्सुकता लागली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी मोर्चाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.
सातारा जिल्हा परिषद क्रीडागंण, अजिंक्य हॉस्पिटल चौक, ग्रीन फिल्ड हॉटेल, मुथा चौक, सिव्हील हॉस्पिटल, पारंगे हॉस्पिटल, एसटी स्टँण्ड, राधिका सिग्नल, न्यु राधिका रोड, राधिका टॉकीज, समर्थ टॉकीज, मोती चौक, राजपथ, शाहू चौक, रयत शिक्षण संस्था ते पोवई नाका अशा प्रकारे मोर्चाचा मार्ग राहणार असल्याची माहिती त्यांनी जाहीर केली. याशिवाय वाहतुकीची व्यवस्था निश्‍चित झाली असल्याचे सांगून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत केले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे उपस्थित होते तर पोनि बी. आर. पाटील यांनी मोर्चा आयोजनाचे पॉवर पॉईंटद्वारे प्रेझेंटेशन केले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मोर्चेकरी वाहनातून उतरण्याची ठिकाणे, वाहने पार्कींगची ठिकाणे व एकत्र जमण्याच्या ठिकाणांची माहिती दिली. मोर्चा संपल्यानंतर आलेल्या रस्त्यानेच परतीचा प्रवास मोर्चेकर्‍यांनी करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी मराठा मोर्चाचे संयोजन समितीचे पदाधिकारी, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक जयसिंह रिसवडकर उपस्थित होते.