Breaking News

उद्योगांच्या उभारणीसाठी बँकांनी मुद्रा योजनेतून अर्थ सहाय्य करावे : नरळे

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : युवकांना उद्योग उभारणीसाठी  विविध बँकांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून अर्थ सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांनी केले.
सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथील नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, आयडीबीआय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अनिल गोडबोले, नाबार्डचे जिल्हा उपप्रबंधक सुबोध अभ्यंकर, आरबीआयचे हेमंत दंडवते, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते.
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना महत्वाची असल्याचे सांगून जिल्हा परिषद अध्यक्ष नरळे म्हणाले, समाजातील योग्य लोकांना या योजनेचा लाभ द्यावा. या योजनेमुळे समाजावर तसेच अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होणार आहे. तरी बँकांनी मुद्रा योजनेची जास्तीत-जास्त प्रकरणे मंजूर करुन आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. राजेश देशमुख म्हणाले, बँकांनी व विविध महामंडळांनी आपापसात समन्वय ठेवून काम करावे. शासनाच्या विविध विभागांकडून येणार्‍या अर्थ सहाय्याची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. मार्च महिन्याची वाट न पाहता दिलेले उद्दिष्ट तसेच विविध शासकीय विभागांकडून येणारी कर्ज प्रकरणे तात्काळ निकाली काढावे.
अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव म्हणाले, पंतप्रधान मुद्रा योजनेची माहिती तहसीलदारांना द्यावी. त्यांच्यामार्फत या योजनेची माहिती तलाठ्यांपर्यंत पोहचविली जाईल. पंतप्रधान मुद्रा योजनेचे काही बँकांनी चांगले काम केले आहे तर काही बँकांनी चांगले काम केलेले नाही. छोटे-छोटे उद्योग सुरु करण्यासाठी बँकांनी अर्थ सहाय्य करावे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. प्रत्येक समाजासाठी विविध महामंडळे आहेत. लाभार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी या महामंडळाच्या योजनांचाही लाभ द्यावा, असे आवाहन केले.
बैठकीत जिल्हा माहिती अधिकारी सातपुते यांनी मुद्रा योजनेसाठी गठीत केलेल्या समितीच्या सदस्यांची माहिती व समितीमार्फत करण्यात येणार्‍या कामकाजाची माहिती दिली. बैठकीस विविध बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.