Breaking News

मुद्रा योजनेतून महिलांनी उद्योजकाकडे वाटचाल करावी : जितेंद्र शिंदे

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : मुद्रा बँक योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनी कृषीवर आधारित पुरक व्यवसाय उभे करुन उद्योजकाकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी केले.
कराड तालुक्यातील बेलवडे बु। येथे मुद्रा बँक योजना समन्वय समिती, आरबीआय, बँक ऑफ इंडिया आणि महालक्ष्मी महिला संस्थेच्यावतीने घेतलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, राज्य ग्राहक परिषदेच्या सदस्य सीमा परदेशी, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, आरबीआयचे अधिकारी हेमंत दंडवते, सरपंच सुनीता शिंदे, उपसरपंच संभाजी मोहिते, बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक प्राजक्ता बिरंगे, आर्थिक साक्षरता समन्वयक नितीराज साबळे, महालक्ष्मी महिला संस्थेच्या अध्यक्ष लक्ष्मी मोहिते, नंदादेवी विभुते उपस्थित होते.
महिलांनी लोणची, पापड, चटणी या व्यवसायाचा शिक्का पुसून टाकून उद्योगाकडे वाटचाल करावी, असे सांगून शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील महिला शेतीवर आधारित गावातल्या गावात खूप चांगला प्रकल्प उभा करु शकतात. देशी कोंबडी पालन, गीर गाय पालन, कडकनाथ कोंबडी पालन, हायड्रोपोनिक चारा निर्मिती, मुरघास निर्मिती, गांडूळ प्रकल्प, शैवाल निर्मिती अशा छोट्या उद्योगांचा यात समावेश आहे. यामधून आर्थिक प्रगती होऊ शकते. परिणामी गावाचा आर्थिक विकास होऊ शकतो. यासाठी गावातील 50 महिला प्रशिक्षणार्थ्यांसाठी कृषी विभागामार्फत सहल आयोजित करण्यात येईल. यातून महिलांना एखाद्या प्रकल्पाला भेट देवून त्याबाबतची माहिती घेता येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.