लघु उद्योजकांच्या प्रश्नांचा शासनाकडे पाठपुरावा करणार
। एमआयडीसीचे क्षेत्रिय व्यवस्थापक संध्या घोडके यांचे आश्वासन । आसमा संघटनेच्या पदाधिकार्यांच्या भेटी दरम्यान झाली चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी) । 13 - एम.आय.डी.सी. मधील लघु उद्योजकांना छोटे-छोटे भूखंड मिळण्याच्या मागणीसाठी एम.आय.डी.सी. चे क्षेत्रीय व्यवस्थापक (नाशिक) सौ.संध्या घोडके यांची अहमदनगर स्मॉल अॅण्ड मायक्रोस्केल मॅन्युफॅक्चरर असो. (आसमा) संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब वेताळ व प्रविणा महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा प्रविणाताई घैसास यांनी भेट घेऊन लघु उद्योजकांचे प्रश्न मांडले. सदर प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भुमिकेने शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सौ.घोडके यांनी दिले.उच्च न्यायलय व सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाने एम.आय.डी.सी. मधील 168 भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेसाठी क्षेत्रीय व्यवस्थापक सौ.संध्या घोडके यांच्या नियंत्रणाखाली मोजमाप सुरु असून, ते नगरला आले असता त्यांच्याशी भेट घेऊन घैसास व वेताळ यांनी लघु उद्योजकांच्या प्रश्नावर चर्चा केली. प्रविणा घैसास म्हणाल्या की, औद्योगिक भूखंडाचे व्यापारीकरण झाल्याने सर्वसामान्य लघू उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे. एम.आय.डी.सी. मध्ये 35 टक्के भूखंड मोकळे असून, हे भूखंड जमा करुन लघु उद्योजकांना लहान-लहान प्लॉटचे वाटप केल्यास त्यांचा जागेचा प्रश्न सुटू शकणार आहे. एम.आय.डी.सी. मधील 168 भुखंड ताब्यात घेतले जात असताना उद्योजकांचे खच्चीकरण होऊन, कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. या प्रकरणात अनेक गरजू उद्योजक ओढले गेले असून, त्यांना वाचवण्यासाठी व लघु उद्योजकांना लहान भुखंड मिळण्याकरिता लवकरच मुख्यमंत्री व एम.आय.डी.सी. चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाऊसाहेब वेताळ यांनी एम.आय.डी.सी. मध्ये सध्या पाचशे उद्योजक भाडेतत्वावर उद्योग चालवत असून, स्वत:ची जागा नसल्याने या उद्योजकांना कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नसल्याचे सांगितले. आसमा संघटना कोणाच्याही विरोधात नसून, गरजू लघु उद्योजकांना एम.आय.डी.सी. मध्ये भुखंड मिळण्याच्या उद्देशाने शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व गुजरातच्या धर्तीवर एम.आय.डी.सी. तील बंद पडलेले कारखाने व मोकळ्या भूखंडाचे लहान-लहान प्लॉट करुन लघु उद्योजकांना देण्याची मागणी केली. यावेळी अनिरुध्द घैसास, किशोर चव्हाण, सुखलाल कळमकर, आबासाहेब गीरे, अनिल कोतकर, चंद्रशेखर पवार, रोहन गायकवाड आदिंसह लघु उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.