Breaking News

शेतकरी व कामगारांना गुलाम बनविल्यास लढा ः डॉ. भारत पाटणकर

सांगली, दि. 13 - भूमिपुत्राच्या छाताडावर कोणी पाय ठेवून शेतकरी व कामगारांना गुलाब करुन जर कोणी भांडवलदार या भूमीत येत असेल तर इथल्या प्रतिसरकारच्या चळवळीसारखा लढा उभारु, असा इशारा श्रमुदचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
करुंगळी (ता. शिराळा) येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात निनाईदेवी साखर कामगार व शेतकरी यांच्या झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. निवृत्ती नायकवडी यांनी स्वागत केले.
डॉ. पाटणकर म्हणाले, कारखाना येथील शेतकरी यांनी उभा केला. तो आमच्या जागेत आहे. तो बेकायदेशीर विकत घेतला आहे. शेतकरी व कामगार यांच्या मानेवर सुरी ठेवून कोण चालवत असेल तर त्या भांडवलशाहीला शेतकरी व कामगारांच्या साथीने उचलून घालवू.
प्रदेश काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख म्हणाले, कामगार प्रश्‍नांबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या सोबत झालेल्या बैठकीत 300 कामगार घेण्याचा कारखाना प्रशासनाने नियम पाळला नाही. भूमिपुत्रांची प्रशासनाकडून गळचेपी सुरु आहे. सन्मानाची वागणूक मिळत नाही. ज्या भूमिपुत्रांनी आयुष्य घातले त्यांना कमी पगार आणि बाहेरुन आलेल्या कामगारांना जास्त पगार देत आहे. हणमंतराव पाटील, पी. वाय. पाटील, के. डी. पाटील, बाजीराव शेंडगे, कादर नायकवडी, सुजित देशमुख, दिनकर शेडगे, बबन भुसारी, शिवाजीराव जाधव, आनंदराव पाटील, वसंत शेटके आदी उपस्थित होते.