मनसे मावळ तालुका अध्यक्ष पदाचा तिढा लवकरच सुटण्याच्या मार्गावर
पुणे, दि. 30 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागील वर्षभरापासून रिक्त असलेले मावळ तालुकाध्यक्ष हे पद लवकरच भरण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर व प्रमोद पाटिल यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच मनसे पदाधिकार्यांची बैठक कामशेत येथे पार पडली.मनसेचे दिवंगत तालुका अध्यक्ष कै. बंटी वाळुंज यांची एक वर्षा पूर्वी हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर मावळात मनसेला मोठी मरगळ आली होती. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत इतर पक्षात प्रवेश केला. एक वर्षापासून तालुका अध्यक्ष पद हे रिक्त असल्या कारणाने कार्यकर्ते ही मोठ्या संभ्रमात होते व येणार्या आगामी निवडणुका या कोणाच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता. मावळातील मनसेच्या काही पदाधिकार्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यांची दखल घेत राज साहेब ठाकरे यांनी मावळ तालुका अध्यक्ष पद निवडीची सूत्रे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व मनसेचे नेते प्रमोद पाटील यांच्याकडे सोपवली होती.
या निवडीचा पहिला टप्पा काल सोमवारी कामशेत येथील गणेश मंगल कार्यालय येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडला. या आढावा बैठकीत तालुका अध्यक्ष पदासाठी रूपेश म्हाळसकर, अशोक कुटे, रामदास येवले, योगेश हुलावळे या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या तसेच या निवडीवरती कार्यकर्त्यांचे म्हणणे समजून घेण्यात आले.
यावेळी बोलताना खोपकर म्हणाले तालुका अध्यक्ष निवडताना कोणाचीही वशिले बाजी व जवळीक पाहून निवड करण्यात येणार नसून ही निवड केवळ प्रामाणिकपणे पक्षासाठी केलेल्या कामांच्या जोरावर करण्यात येईल. तसेच या निवडीवरती अंतिम शिक्का मोर्तब राज ठाकरे हे करतील, असे सांगितले. या बैठकी दरम्यान पंकज गदिया व अकबर शेख यांच्या नेतृत्वाखाली कामशेत येथील 250 तरुणांनी खोपकर यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला.