Breaking News

सोलापूर, नगर जिल्ह्यांतून मोर्चेकरी सहभागी

पुणे, दि. 30 - बारामती येथील मराठा क्रांती मोर्चासाठी दौंड, पुरंदर, इंदापूर, फलटण आदी तालुक्यांतून लोंढेच्या लोंढे स्वयंशिस्तीने भगवे ध्वज फडकवत भीमथडीत येऊन थडकले. बारामती तालुक्यातूनही सोमेश्‍वरनगर, माळेगाव, सांगवी, सुपे, मोरगाव, लोणी भापकर, शिर्सुफळ, काटेवाडी अशा सर्व बाजूंनी हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी दुचाकी, चारचाकी रॅलीद्वारे दाखल झाले. सोलापूर व नगर जिल्ह्यांतूनही लोक आले होते. 
पुणे शहरातून सकाळी सात वाजताच मराठा बांधव रॅलीद्वारे बारामतीकडे निघाले. नगर जिल्ह्याच्या कर्जत, राशीन या भागांतून, तर सोलापूर जिल्ह्याच्या टेंभुर्णी, बार्शी, माळशिरस या पट्ट्यातून जथ्थेच्या जथ्थे बारामतीत दाखल झाले होते. दौंड तालुक्यातून बहुसंख्य कार्यकर्ते दुचाकी रॅलीद्वारे बारामतीत आले. विशेषतः कुरकुंभ भागातून मोठ्या संख्येने रॅली येत होत्या.
याशिवाय नऊच्या दौंड-बारामती रेल्वेनेही अनेक समाज बांधव बारामतीत पोचले. इंदापूर तालुक्यातून दुचाकी, चारचाकीची रॅली काढत भगवे ध्वज फडकवत हजारोंच्या संख्येने लोक साडेआठ वाजता निघाले. निमगाव केतकी, वालचंदनगर, भवानीनगर, सणसर, पिंपळी लिमटेक या ठिकाणांहून हजारो लोक त्यात मिसळले. इंदापुरातून सुमारे चाळीस ते पन्नास हजार बांधव मोर्चाला आल्याचा दावा संयोजकांनी केला. पुरंदर तालुक्याच्या सासवड, जेजुरी पट्ट्यातील लोक मोरगावमार्गे, तर वाल्हे, नीरा या पट्ट्यातील रॅली सोमेश्‍वरनगरमार्गे बारामतीत दाखल झाल्या. फलटण तालुक्यातूनही सकाळी नऊला मोर्चेकरी निघाले ते दहापर्यंत बारामतीत पोचले.
 बारामती तालुक्याच्या निंबूत-सोमेश्‍वरनगर परिसरातील वीस-पंचवीस वाड्यावस्त्यांवरून कार्यकर्ते करंजेपूल येथे जमले. तेथून दुचाकी, चारचाकी रॅली तर निघाल्याच; पण काही उत्साही कार्यकर्ते आरामदायी गाड्यांतून बारामतीत दाखल झाले. कोर्‍हाळे, पणदरे येथूनही प्रत्येकी चार-पाच हजार मराठा समाजबांधव महिलांसह मोर्चाला आले होते. सुपे येथे आजूबाजूच्या बारा वाड्यांमधून लोक एकत्र झाले आणि दुचाकी रॅलीद्वारे मोर्चात येऊन दाखल झाले. सोनवडी सुपे, शिर्सुफळ, उंडवडी (क.प.), सावंतवाडी, खराडेवाडी या गावांमधील लोक उंडवडी सुपे येथे एकत्र जमून अर्ध्या तासात शिस्तीत मोर्चात सामील झाले. तालुक्याच्या सर्व पट्ट्यातून महिला, युवती मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाल्या. भगवे ध्वज, भगव्या टोप्या, गाड्यांवरील स्टिकर्स यामुळे रॅलीमध्ये उत्साह संचारला होता.